PM Narendra Modi : मोदींचे नेतृत्व… देशाची गरज! | महातंत्र

प्रवीण दरेकर भाजप गटनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रूपाने भारतवर्षाला प्रथमच अलौकिक असे नेतृत्व लाभले आहे. हे माझे अर्थात राजकीय विधान नाही किंवा ही पक्षीय स्तुतीदेखील नाही. मी नरेंद्र मोदी यांना ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ओळखतो. त्यांचे काम तेव्हापासून पाहात आलो. ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत गुजरातला जाण्याचा योग मला आला. तिथे उभी केलेली विकासकामे पाहण्यासाठी मोदी यांनी राज ठाकरेंना ‘स्टेट गेस्ट’अर्थात राज्य सरकारचे विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. राज यांच्यासोबत त्यांचे आम्ही तिघे-चौघे सहकारी नेते गेलो होतो. त्याच भेटीत मला नरेंद्र मोदी यांचे अफाट व्हिजन जवळून बघता आले. त्यांच्याशी याच दौर्‍यात एक तास संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली.

संबंधित बातम्या :

संवादात आम्हीही काही प्रश्न विचारत होतो. साबरमतीच्या काठी मोदींनी तेव्हा केलेला विकास हा देशभर चर्चेचा विषय झाला होता. असंख्य झोपड्या, लहान-मोठी धार्मिक स्थळे मध्ये उभी असताना ती हटवून साबरमतीचा काठ मुक्त श्वास घेईल, असा प्रकल्प मोदींनी उभा करून दाखवला. हे कसे शक्य झाले? आमच्याकडे मुंबईत अशा प्रकल्पासाठी चार झोपड्या हटवायच्या किंवा चार-सहा इमारती बाजूला करायच्या तर प्रचंड रोष पत्करावा लागतो, कोर्टकचेर्‍या होतात आणि त्यातच अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे अडकून पडतात. राज ठाकरे यांच्या या प्रश्नावर मोदी म्हणाले होते, चांगल्या प्रकल्पांसाठी लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक असेल तर त्यांना मी पुनर्वसनाच्या चांगल्या संधी, उत्तम पर्याय देतो. एवढे करूनही लोक प्रकल्पाला आडवे येणार असतील तर मात्र माझे प्रशासन आपल्या पद्धतीने अ‍ॅक्शन घेते… नरेंद्र मोदी यांच्या या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता आणि नवनिर्माण करण्याचा द़ृढ निश्चय डोकावत होता. (PM Narendra Modi)

पुढे मी भारतीय जनता पक्षात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना अनेक शिबिरांमधून, बैठकांमधून, जाहीर सभांमधून ऐकण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या या सर्व संवादांतून मला एक गोष्ट सारखी जाणवत राहिली ती ही की, हा एकमेव नेता असा आहे की, जो आपल्या देशाचा, आपल्या देशातील सामान्यांतल्या सामान्य माणसाचा म्हणजे गरिबांचा सदा सर्वकाळ विचार करतो. स्वप्ने सारेच पाहतात. मात्र, सतत पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणारे फार कमी नेते असतात. मोदी हे अशा दुर्मीळ नेत्यांपैकी एक नेते होत. नऊ वर्षे म्हणण्यापेक्षा मोदींची राजवट आता दशकपूर्तीकडे निघाली आहे. या कारकिर्दीत नरेंद्र मोदी यांनी या नऊ-दहा वर्षांत देशात जे काम उभे केले ते केवळ अद्भुत असे आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. या पंच्याहत्तर वर्षांतील आधीच्या साठ-पासष्ट वर्षांपेक्षा गेल्या नऊ-दहा वर्षांची कारकीर्द अत्यंत उजवी म्हणावी लागते. देशातील प्रत्येक राज्याला मोदींच्या नेतृत्वाचा स्पर्श (PM Narendra Modi) झालेला दिसतो. ज्या ईशान्य भारताकडे क्वचित लक्ष जायचे त्या ईशान्य भारतात केंद्रातल्या सरकारचे प्रचंड येणे-जाणे वाढले आणि सेव्हन सिस्टर्सचा हा प्रदेश भारताच्या मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडला गेला. देशाचा हिंदी पट्टा असो की दक्षिण पट्टा असो. काश्मीर ते कन्याकुमारी असे हे सांस्कृतिक राष्ट्रजीवन मोदींनी थेट केंद्र सरकारच्या प्रशासनाशी जोडले. त्यामुळेच देशाच्या कानाकोपर्‍यात लहानसहान आणि महाकाय प्रकल्प उभे राहिले, गतिमान झालेले दिसतात. देशाची प्रगती झाल्याशिवाय जगदेखील विचारत नसते. या प्रगतीमुळेच आज जगभरात भारताचे नाव घेतले जाते. भारताला कधी नव्हे इतके महत्त्व मिळते आहे. यापूर्वी अशी प्रतिष्ठा देशाला कधीही मिळाली नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारखे चोवीस तास काम करणारे नेतृत्व लाभले म्हणून हे शक्य झाले.

हा नेता स्वत: सोळा-सोळा तास काम करतो. त्यांचे कोणतेही वेळापत्रक पाहिले की जीव दडपून जातो. सकाळी दिल्लीत असतील तर संध्याकाळी जगाच्या कुठल्या तरी देशात पोहोचून त्यांच्या बैठकाही सुरू झालेल्या असतात. अखंड प्रवास, अखंड काम, अखंड ध्यास असा हा मोदींच्या वेळापत्रकाचा धबडगा आहे. देशासाठी अपार कष्ट उपसण्याची उमेद त्यांच्यात आहेच आणि ही उमेद कृतीमध्ये उतरवण्याची धमक असल्यामुळेच एक ऐतिहासिक कारकीर्द नरेंद्र मोदी देशासमोर आणि जगासमोरही उभी करू शकले. ते स्वत:ही काम करतात, पक्ष कार्यकर्त्यांनाही कामाला लावतात आणि सरकारच्या प्रशासनालाही त्या कामात उतरवतात. सर्वांना सोबत घेऊन एखादी मोहीम राबवणे हे नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनकौशल्याचे फार मोठे वैशिष्ट्य होय. अगदी कोरोना काळातही छोटे-छोटे उपक्रम देऊन त्या भीषण संकटात त्यांनी सामान्य माणसाला वैद्यकीय यंत्रणेच्या पाठीशी मानसिक पातळीवर उभे केले. समाजातील, राजकारणातील, अर्थकारणातील सर्व घटकांचा सहभाग आपल्या कारभारात ते घेतात आणि म्हणूनच हा देश कधी नव्हे इतक्या अफाट वेगाने पुढे जातो आहे. समाजाचा असा सहभाग, तोही देशपातळीवर या देशाने आजवर कधी अनुभवला नाही. ‘मन की बात’ हा त्यांचा रविवारचा संवाद याचा उत्तम दाखला ठरावा. (PM Narendra Modi)

आकाशवाणीवर आले आणि मनात येईल ते विचार बोलून दाखवले इतका मर्यादित हा संवाद नसतो. या संवादासाठी देशभरातून विषय सुचवणारी, प्रश्न मांडणारी, प्रसंगी उपाय सांगणारी लाखो पत्रे येतात. या पत्रांचा अभ्यास केला जातो. त्यातून निवडक पत्रे, निवडक विषय, निवडक प्रश्न, भावलेले उपाय घेऊन नरेंद्र मोदी ‘मन की बात’ सांगताना ते प्रश्न, ते उपाय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवतात आणि प्रत्यक्षातही आणतात. मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यात आले तेव्हा या संतभूमीतील संतांची नावे घेऊन नरेंद्र मोदींनी वारकरी संप्रदायाशी, महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांचा अभ्यास आणि व्यासंग डोकावतो. या देशातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारा, त्यांचे वार्षिक परीक्षेचे टेन्शन समजून घेणारा आणि ते दूर करणारा हा पहिलाच पंतप्रधान देशाला लाभला. (PM Narendra Modi)

या अशा संवाद यात्रेमुळेच नरेंद्र मोदी यांच्या या संवादाला सुप्त चळवळीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. राष्ट्राचा कोणताही घटक आचार-विचारातून आणि नजरेतून सुटत नाही ते खरे राष्ट्रीय नेतृत्व. या कसोटीवर आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव राष्ट्रीय नेतृत्व देशपातळीवर दिसते. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सहकार क्षेत्र आजवरच्या सर्वच पंतप्रधानांच्या नजरेतून सुटले किंवा ते उपेक्षित राहिले, ठेवले गेले असे म्हणा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये प्रथमच सहकार खात्याची म्हणजेच सहकार खात्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समर्थ नेतृत्वाच्या हाती हे खाते सोपवले. या खात्याला राष्ट्रीय व्यापकता मिळवून दिली.

आज मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानी म्हणून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे शहर म्हणून आकाराला येत आहे. याचे सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यावे लागेल. याचे कारण, मुंबईतील एकूण एक पायाभूत प्रकल्पांकडे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत बारीक लक्ष असते. या आधीच्या अडीच वर्षांत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने दिल्लीशी सहकार्याची भूमिका घेतली नाही. त्यातून मुंबईच्या विकासाला खीळ बसली. अनेक प्रकल्प तसेच रखडून पडले. काही निधीअभावी रखडले, तर काही कोर्ट कचेर्‍यांमुळे रखडले होते. गेल्या दीड वर्षात महायुतीच्या सरकारने केंद्राशी समन्वय ठेवून हे रखडलेले प्रकल्प आधी मोकळे केले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही केंद्राशी आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समन्वय साधला. या महासमन्वयातून मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र नवी झेप घेण्यास सज्ज होताना दिसतो. या दशकात जी पायाभरणी झाली तिच्या जोरावर आता देशाला जागतिक महासत्तेच्या स्वप्नाला गसवणी घालायची आहे. म्हणूनच देशाचे नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच हाती देण्याकडे राष्ट्राचा कौल दिसतो. सर्वांगीण विकास ही देशाची गरज आहे, तर नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नेतृत्व हीदेखील या देशाची राष्ट्रीय गरज ठरते.

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी असेल, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी असतील, तरुणांना उद्योजकतेकडे नेणारे स्टार्ट अप प्रकल्प असतील, महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठांना आधार देणार्‍या योजना असतील, या सर्वच घटकांच्याबद्दल एक व्हिजन आणि त्यासोबतच जबरदस्त संवेदना नरेंद्र मोदी यांच्या ठायी दिसते. आज शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला 12 हजार रुपये थेट जमा होतात. गरिबांना महिन्याला पाच किलो धान्य दिले जाते. गरिबांसाठी स्वस्तात घरे बांधणारी पंतप्रधान आवास योजना सर्वच राज्यांत हक्काचे छप्पर देणारी ठरते आहे. गरिबांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान भारत योजना तर संजीवनीच ठरली आहे. घरोघरी नळ देणारी हर घर जल योजना आणली. विशेष म्हणजे जनसामान्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण दिले. अशा अनेक नव्या योजना सामान्य माणसांसाठी येत आहेत आणि म्हणूनच देशातील जनता मोदींसोबतच ठामपणे उभी आहे. राजकारण म्हटले की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष आलेच आणि त्यांची टीका-टिप्पणीदेखील आली. मात्र, आज कडवट विरोधी पक्षही खासगीत मोदींच्याच नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतात आणि देशाची सत्तासूत्रे 2024 मध्ये मोदींच्याच (PM Narendra Modi) हाती जातील याची खात्री बाळगतात.

भारताच्या द़ृष्टीने खरे तर ही दशकाची वाटचाल म्हणजे अभिमानपर्व होय. जगभरातील मी मी म्हणणार्‍या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत कोलमडून पडल्या. अशा परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे, सक्षम ठेवणे हे मोठे अवघड आणि जिकिरीचे काम होय. ही अशक्य गोष्ट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने शक्य करून दाखवली. म्हणूनच जागतिक मंदीच्या वातावरणातही भारताच्या अर्थव्यवस्थेने थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. 2024 ला नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हाती पुन्हा देशाची सत्तासूत्रे जातील तेव्हा भारताची वाटचाल अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान निर्माण करण्याकडे सुरू झालेली असेल.

हे ही वाचा :

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *