पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना: 30 लाख कारागिरांना लाभ होणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून 30 लाख कारागिरांना लाभ होणार आहे. ही योजना 13 हजार कोटींची असून योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अण्णाभाऊ साठे सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पीएम विश्वकर्मा योजना सर्वसामान्य कारागिरांसाठी आहे. देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. त्यासाठी त्याला 5 टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबत कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज 500 रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे. उत्पादित वस्तूंना बाजार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवितांना सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेतले. 32 कोटी नागरिकांचे जनधन खाते सुरू झाले आहेत. नागरिकांच्या सहभागातून देशात स्वच्छतेची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. कोविड काळात 80 कोटी गरिबांना मोफत धान्य देण्यात आले, असेही पालकमंत्री म्हणाले. पीएम विश्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पीएम विश्वकर्मा योजना ही सामान्य कारागिरांसाठी योजना आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांना आवश्यक साधने देण्यात येणार आहेत. कारागिरांसाठी पुरस्कारही देण्यात येणार आहेत. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार तापकीर म्हणाले, जनधन योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान निधी योजना अशा अनेक कल्याणकारी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आल्या आहेत. देशात पायाभूत सुविधांचा विकासही मोठ्या प्रमाणात होत असून मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण, व्यवसायासाठी 15 हजारापर्यंत साहित्य आणि कर्ज सुविधा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *