नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश डीजेवाजवणाऱ्या २२ गणेश मंडळांवर गुन्हे: डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई

छत्रपती संभाजीनगर43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • रोज तीन तक्रारी न्यायालयाने घालून दिलेल्या डेसिबलची अट मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई
  • डीजेच्या आवाजावर ५ ठिकाणांहून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष

गणेशाेत्सवाच्या काळात माेठ्या आवाजात डीजे वाजवण्यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात लाऊडस्पीकर व डीजे वाजवत अाहेत. यामुळे शहरातील २२ गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाजाने स्पीकर वाजल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांच्या विशेष शाखेकडून सांगण्यात आले.

Related News

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी डीजेवरील कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. शहरातील १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांना ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी १८ यंत्रे दिली आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या डेसिबलनुसार आवाज नसल्यास पोलिस कारवाई करत आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे ९०० मंडळे आहेत. या सगळ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिस ठाणीनिहाय पेट्रोलिंगच्या दरम्यान ही कारवाई करण्यात येते आहे. विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीतही अशी कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात एकूण ४८ सायलेंट झोन
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पोलिस नियंत्रण कक्ष तसेच डायल ११२ वर ध्वनिप्रदूषणाच्या राेज तीन तक्रारी येत अाहेत. त्यानुसार पोलिस कारवाई करत आहेत. सिडकाे एन-१, एन-५, कांचनवाडी, दौलताबाद फार्म हाऊस, देवळाई परिसर या भागातून या तक्रारी आल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी पुंडलिकनगर व जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याने पोलिसांनी त्या गणेश मंडळांना ताकीद देत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ४८ सायलेंट झोन आहेत. त्यात प्रामुख्याने रुग्णालये, विद्यापीठ परिसर, कॅन्टोनमेंट, पोलिस आयुक्त कार्यालय, अधीक्षक कार्यालय, विमानतळ, शाळा, महाविद्यालयांचा समावेश अाहे.

डेसिबल मोजण्याचे काम खासगी एजन्सीला
डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बारीक लक्ष अाहे. डेसिबल मोजण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. ही एजन्सी क्रांती चौक, गुलमंडी, सिटी चौक, उस्मानपुरा आणि सिडको येथून डेसिबलची नाेंद घेते. आतापर्यंत ६५ ते ७० डेसिबल दरम्यान डीजेचा आवाज राहिला आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी डाॅ. प्र. प्र. मुंडे यांनी दिली.

गणेशोत्सवातील वाद्यांच्या आवाजासंबंधी आज सुनावणी
छत्रपती संभाजीनगर | गणेशोत्सवात विनापरवानगी मंडप उभारून माेठ्या अावाजात वाद्य वाजवली जातात. यासंबंधी दाखल याचिकेवर २६ सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. शहरातील मराठी वादळ प्रतिष्ठानच्या विरोधात सिडको एन-७ येथील अस्मिता पार्क सोसायटीच्या वतीने अॅड. हेमंत सुर्वे यांनी याचिका दाखल केली. याचिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गणेश मंडळाचे संस्थापक पृथ्वीराज राठोड यांना प्रतिवादी केले आहे. लातूर येथील याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. प्रियंका शिंदे व अॅड. प्रशांत शिंदे यांनी याचिका दाखल केली. खंडपीठाने कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळास प्रतिवादी केले आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *