नागपूर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मणिपूर घटनेमुळे देशाची प्रतिमा डागळली जात असून याचा आता राजकीय वापर केला जात आहे असा आरोप माजी आमदार आणि भाजपाचे प्रवक्ते डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. विराेधकांनी मणिपूर घटनेचा राजकीय वापर करण्याऐवजी मोदींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
मणिपूरमधील दोन आदिवासी जमातीमधील वाद नवा नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यात सातत्याने खटके उडत आहे. मात्र आजवर त्यांनी एकमेकांचे कधी मुडदे पाडले नाहीत. महिलांवर हात उगारला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हापासून मणिपूर आणि शेजारच्या राज्यांमध्ये शांतता होती. मागील काही वर्षांत हिंसाचार आणि आपसी संघर्षाच्या घटनांचीही नोंद नाही. असे असताना अचानक एका आदिवासी जमातीने दुसऱ्या जमातीच्या महिलांना नग्न करून, त्यांची काढलेली धिंड ही घटना जरा वेगळी आहे असे देशमुख यांनी म्हटले आहे.
मणिपूरच्या वादाला आता दुदैवाने धार्मिक रंग दिला जात आहे. त्यापेक्षा अधिक दुर्दैवाची बाब म्हणजे देशातूनच हे प्रयत्न केले जात आहे. मैतेई समाज हिंदू असून त्यांची लोकसंख्या 64 टक्के आहे. उर्वरितांमध्ये कुकी, नागा व इतर जाती आहेत. कुकींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे. ख्रिश्चन मिशनरी येथे अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. काही कुकी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माला मानतात. अशा सामाजिक वातावरणात भाजप सत्तेवर आल्याने या वादाला आता धार्मिक रंग दिला जात आहे. त्यात अधिकाधिक तेल ओतले जात आहे. निव्वळ राजकारणासाठी हे केले जात असेल तर देशाच्या हिताच्या विरुद्धच आहे.
पूर्वोत्तर राज्यांना 50 हून अधिक वेळा भेटी देणारे नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. गृहमंत्री अमित शाह यांची खास नजर या राज्यांवर आहे. मागील नऊ वर्षांत भाजपने केलेला विकास आणि सामाजिक लाभाच्या योजना बघून आठ हजारपेक्षा अधिक युवकांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत. दशकभरातील घटनांची आकडेवारी बघितल्यास पूर्वोत्तर राज्यांमध्ये 67 टक्के हिंसेच्या घटनांमध्ये कपात झाली आहे. सर्वसामान्यांचे मृत्यू 83 तर सैनिकांच्या मृत्युची संख्या 60 टक्के कमी झाली आहे.
येथे शांतता प्रस्थापित होत असल्याचे बघून देशाच्या शत्रुंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठल्याही परिस्थितीत मणिपूरला अशांत व भारताला अस्थिर करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. भाडोत्री गुंडाकडून दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली. आदिवासींच्या दोन समाजात भांडणे लावून असंतोष निर्माण केला जात आहे.