पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची चार वर्षांनंतरची घरवापसी ही अचानक नसून, ती पाकिस्तान सैनिकांशी असणारे साटेलोटे आणि राजकीय लाभापोटी आखलेली नियोजनबद्ध राजकीय चाल आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत याच शरीफांनी लष्करावर त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणार्या इम्रान खान यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. मात्र सध्या इम्रान खान सध्या लष्कराशी संघर्षामुळे तुरुंगात आहेत. यावरून पाकिस्तानातील राजकारणावरचा लष्कराचा पगडा स्पष्ट होतो.
आर्थिक रूपाने दिवाळखोरीचा सामना करणार्या आणि नागरी असंतोषामुळे अस्वस्थ बनलेल्या पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. या ताणाताणीतून जाणार्या पाकिस्तानात तीनवेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाज शरीफ यांची एंट्री झाली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन)चे अध्यक्ष असणार्या नवाज शरीफ यांचा विजनवास पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतणे ही एक सुनियोजित राजकीय चाल आहे.
शरीफ यांना एव्हेन फिल्ड आणि अल अजिजियाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. तसेच तोशखाना वाहन प्रकरणातही त्यांना गुन्हेगार ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी शिक्षा होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर नवाज शरीफ यांनी तब्येतीचे कारण सांगून लंडनला पळ काढला आणि तेथेच थांबले. आज नवाझ शरीफांचे आगमन झालेले असताना माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिके-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान तुरुंगात आहेत. अलीकडेच पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने राजनैतिक केबल (सीफर) लीक करणे आणि देशातील गोपनीयतेच्या कायद्याचे पालन न करणे, याप्रकरणी इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यावर आरोप निश्चित केलेले आहेत.
पाकिस्तानची सत्ता मिळवण्याची स्थिती निर्माण करण्यासाठी आणि नवाज शरीफांचा परतीचा मार्ग सुलभ करण्यासाठी इम्रान खान यांच्याविरुद्ध अधिकाधिक अडचणी निर्माण करणे हा एक प्रकारे राजकीय कुटनीतीचा भाग म्हणावा लागेल. दुसरीकडे, 19 ऑक्टोबर 2023 रोजी एव्हेन फिल्ड आणि अल अजिजिया भ्रष्टाचार प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शरीफ यांना अटकेपासून संरक्षण दिले. शरीफांना जामीन मिळणे आणि इम्रान यांच्यावरील आरोप सिद्ध होणे, यातून पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवाझ शरीफांच्या आगमनाच्या वेळी विमानतळावर अधिकृतपणे व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल पाळण्यात आला आणि इस्लामाबाद विमानतळाला सुरक्षेचे कडेही करण्यात आले. ही विशेष काळजी पाकिस्तानातील राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट करणारी आहे.
लाहोर येथील रॅलीतील त्यांचे भाषणही आगामी राजकीय डावपेचाचे आकलन करून देणारे आहे. त्यांचे हेलिकॉप्टर लाहोर किल्ल्याजवळ दिवाण-ए-खास येथे तयार केलेल्या विशेष हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर नवाज यांच्या वाहनांचा ताफा हा मीनार-ए- पाकिस्तानला नेण्यात आला. तेथे त्यांनी एका सभेला मार्गदर्शन करताना सांगितले, ‘जे प्रेम आपल्या डोळ्यात पाहत आहे, त्यावर मला अभिमान आहे. आपण नेहमीच पाकिस्तानचे प्रश्न निकाली काढले आहेत. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज केले, देशातील वीज स्वस्त केली. परंतु माझ्याविरुद्ध बनावट खटले दाखल करण्यात आले. एवढेच नाही, तर भाऊ शाहबाज शरीफ आणि मुलगी मरियमविरुद्धदेखील कारस्थान रचले गेले. आपल्या प्रेमाने माझे सर्व दु:ख विसरून गेले आहे. मात्र काही जखमा भरत नाहीत. मी आई-वडील आणि पत्नीला राजकीय कारणामुळे गमावले. आपल्याला बदला घेण्याची इच्छा नाही. आपण केवळ जनतेचे भले करू इच्छित आहोत.’ यावेळी नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला विकासाच्या मार्गावर नेण्याची शपथ घेतली. पनामा पेपर्स प्रकरणाच्या विरोधात लागलेल्या निर्णयाचा उल्लेख करत या खटल्यामुळे पाकिस्तानच्या विकासाला खीळ बसली, असा दावाही शरीफांनी केला. लोकानुनयासाठी शरीफांना अशा प्रकारची आश्वासने देणे आणि बतावण्या करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानवर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे लष्कराचाच वरचष्मा आहे, ही बाब जगजाहीर आहे. सैन्य दलात ज्या नेत्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, त्याला सत्ता सोडून पायउतार व्हावे लागले आहे. मग नवाज शरीफ असो किंवा इम्रान खान!
इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, ही बाब खरी असली, तरी त्याची पाळेमुळे पाकिस्तानच्या एकूण इतिहासातही आहेत, हे नाकारता येणार नाही. लष्कराच्या मर्जीनुसार चालणार्या पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना मुळात मुक्तहस्ताने ध्येयधोरणे ठरविण्याचा अधिकारच आहे का? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच पाकिस्तान आजवर कधीच विकासाच्या दिशेने झेपावताना दिसला नाही. आपल्या उपद्रवमूल्याच्या आधारे पाश्चिमात्य राष्ट्रांकडून मिळणार्या मदतीच्या पैशावर पाकिस्तानातील लष्करशहा मालामाल झाले आणि त्यांनी पाकिस्तानातील अनेक पिढ्या बरबाद केल्या. धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवादाची पेरणी करून पाकिस्तानी तरुणांचे भवितव्य नासवले. औद्योगिक विकास, तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास याबाबत पूरक धोरणे तेथील राज्यकर्त्यांनी न घेतल्याने हा देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. याची जबाबदारी तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफांवरही जाते हे नाकारता येणार नाही.
इम्रान खान यांनी याच धोरणांवर टीका करत पाकिस्तानच्या जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले होते; परंतु लष्कराशी पंगा घेतल्याने आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात अडकल्याने त्यांनाही अपयश आले. तथापि, आजही इम्रान यांची पाकिस्तानातील लोकप्रियता घटलेली नाहीये. त्यांना जनतेचे चांगले समर्थन आहे. अटकपूर्व काळात त्यांच्या सभांना होणारी गर्दी किंवा अटकेनंतर इम्रान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानात उसळलेला जनसमुदाय याची साक्ष देणारा आहे. पाकिस्तानी लष्कराला नेमकी हीच बाब खटकत होती. त्यामुळे त्यांनी इम्रानला पर्याय म्हणून शरीफांना मैदानात उतरवले. त्यांना देशात प्रस्थापित करण्याच्या निर्णयावरून एक करारही केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचे सत्ताकेंद्र पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी विणलेले जाळे म्हणून शरीफांच्या आगमनाकडे पाहावे लागेल. येणार्या काळात या नाटकाचा उत्तररंग काय असतो हे समोर येईलच.
इम्रान सरकार पडल्यानंतर 2022 ते या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पंतप्रधान म्हणून काम केलेले शाहबाज शरीफ यांना नवाज शरीफ यांच्यासारख्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभवीच्या पुनरागमनानंतर सार्वत्रिक निवडणुकीत काहीशी आघाडी नक्कीच मिळेल. मात्र, पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय असलेल्या इम्रान खान यांच्या पाठिंब्याला छेद देणे शरीफ बंधूंसाठी आव्हानात्मक काम असेल. कोणताही देश शेजार्यांशी लढून प्रगती करू शकत नाही, असे विधान शरीफांनी पुनरागमनानंतर केले आहे. यातून त्यांनी आपण सत्तेत आल्यास भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करू, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारताच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कारवाया आणि अमली पदार्थांची, शस्त्रास्त्रांची तस्करी थांबल्याशिवाय दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होणार नाहीत.