सांगली33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. सोमवारी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांच्या सांगोला मतदारसंघात स्वराज्य संघटनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत संभाजीराजे छत्रपतींनी राज्यातील सध्याच्या राजकारणावरून थेट भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधत आपण जनतेसाठी वेगळा पर्याय घेऊन आल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काठावर निवडून आलेल्या शहाजीबापू यांच्यासमोर स्वराज्य संघटना आव्हान ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहाजीबापूंची चिंता वाढली आहे.
राजकारण्यांनी पातळी सोडली
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्यात पहिले भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती होती. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली. आता शिवसेना अन् राष्ट्रवादी सत्तेत आणि विरोधात देखील आहे. सध्या राज्याच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आणि नेत्याकडून दुसऱ्या पक्ष आणि नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेच तेच राजकारणी पातळी सोडून बोलत आहेत.
मी एक वेगळा पर्याय घेऊन आलो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता संभाजीराजे छत्रपती म्हणाले, जे चक्की पिसिंग म्हणत होते, तेच आज मांडीला मांडी लावून बसलेत. कोणाला सत्तेत बघायचे आणि कोणाला विरोधात अशी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे मी जनतेसाठी एक वेगळा पर्याय घेवून आलो आहे.
शहाजीबापूंवर सडकून टीका
शहाजीबापूंचा समाचार घेताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, गुवाहाटीत असताना शहाजीबापूंनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. त्यावेळी अर्थमंत्री अजितदादा निधी देत नसल्याचे सांगत होते. पण आता मात्र निधीसाठी बापुंना याच अजितदादांकडे जावे लागणार आहे. सांगोल्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य आहे. सुरू असलेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याची टीकेची झोड संभाजीराचे छत्रपतींनी उठवली.
जनतेने जातीच्या पलीकडे जावे
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मी खूपच अस्वस्थ झालो. खासदार, आमदारांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. दीड वर्षापासून किसान रेल्वे बंद असल्याने खासदारांनी संसदेत रेल्वेचा प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला. वेळप्रसंगी मी सोबत येण्यास तयार आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध नाहीत. मतदारांनी जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मतदान करावे.