गयाना : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकेत मात्र भारताची दाणादाण उडाली असून दुसर्या टी-20 सामन्यात भारताला 2 विकेटस्नी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाला विंडीजने 151 धावांत रोखले आणि हे आव्हान 7 चेंडू आणि 2 विकेटस् राखून पार केले. विंडीजच्या निकोलस पूरनने 40 चेंडूंत 67 धावांची धडाकेबाज खेळी करीत टीम इंडियाची भंबेरी उडवली. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. पूरनची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजाने पुढील 3 धावांत 4 विकेटस् घेत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर फेकले आणि हातातून निसटलेला सामना खेचून आणला होता. मात्र, 19 व्या षटकात सामना फिरला अन् विंडीजने 2-0 अशी आघाडी घेतली. तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत विंडीजकडून सलग दोन सामन्यांत हरला.
152 धावांचे लक्ष्य गाठताना हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजच्या ब्रेंडन किंग व जॉन्सन चार्ल्स या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. कायले मेयर्स (15) व निकोलस पूरन यांनी चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु अर्शदीप सिंगने ही जोडी तोडली. रवी बिश्नोईच्या पहिल्याच षटकात निकोलसने 4,6,0,4,4,0 अशी फटकेबाजी केली. निकोलस व कर्णधार रोव्हमन पॉवेल (21) यांनी 37 चेंडूंत 57 धावांची भागीदारी केली. पूरनने भारताची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यात शिमरोन हेटमायरची भर पडली. मुकेश कुमारने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पूरन 40 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 67 धावांवर झेलबाद झाला.
पुढच्या षटकात बिश्नोईने 1 धाव देत विंडीजवर दडपण वाढवले अन् त्याच्या पुढील षटकात रोमारिओ शेफर्ट (0) रनआऊट झाला. त्यानंतर यजुवेंद्र चहलने विंडीजला मोठा धक्का दिला. जेसन होल्डरला (0) त्याने यष्टिचित केले आणि भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. त्याच षटकात चहलने मोठी विकेट मिळवताना हेटमायरला (22) पायचित केले. यावेळी 24 चेंडू 24 धावा विंडीजला हव्या होत्या अन् भारताला 2 विकेटस् घ्यायच्या होत्या. 12 चेंडूंत 12 धावांची गरज असताना हार्दिकने चेंडू मुकेश कुमारकडे दिला, पण कर्णधाराचा हा डाव फसला. अल्झारी जोसेफने दुसराच चेंडू षटकार खेचून सामना 9 चेंडूंत 4 धावा असा आणला. जोसेफने 1 धाव घेत अकिल होसेनला स्ट्राईक दिली अन् त्याने 2 धावा घेतल्या. होसेनने चौकार खेचून 18.5 षटकांत 8 बाद 155 धावा करून विंडीजचा विजय निश्चित केला. हार्दिकने 35 धावांत 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसर्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 152 धावा केल्या. भारताकडून युवा फलंदाज तिलक वर्माने पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणे दुसर्याही सामन्यात दमदार खेळी केली. 20 वर्षांच्या तिलकने दुसर्याच सामन्यात आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. तिलक वर्मा सोडला तर इतर भारतीय फलंदाजांनी निराशाच केली. सूर्यकुमार यादव तर 1 धाव करून धावबाद झाला अन् संजूने 7 धावांचे योगदान देत पॅव्हेलियन गाठले. इशान किशनने 27 तर हार्दिक पंड्याने 24 धावांचे योगदान दिले. विंडीजकडून अकील हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.
The post पूरनचा झंझावात; विंडीज विजयी appeared first on महातंत्र.