Praful Patel : देशपातळीवर मोदींना पर्याय नाही, विरोधकांची आघाडी अनैतिक : प्रफुल्ल पटेल यांचा आरोप | महातंत्र








 नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : देशपातळीवर नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, केवळ मोदी विरोधासाठी एकत्र आलेल्या विरोधकांची विस्कळीत आघाडी त्यांचा मुकाबला करू शकणार नाही, केवळ फोटोसेशनपुरत्याच बैठका आहेत. साधे एकमताने लोगोचे अनावरण होऊ शकत नाही, देश जुळणारच नाही तर जिंकणार कसा? असा सवाल उपस्थित करतानाच डाव्या, उजव्यांची ही अनैतिक आघाडी असल्याचे टीकास्त्र आज (दि. २ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोडले.

नागपूर व विदर्भातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होऊ दिली नाही असे ताशेरे पटेल यांनी यावेळी ओढले. जे आपल्यासोबत आले नाहीत त्यांची चिंता करू नका, आजवर काँग्रेसशी आघाडी करून लढताना आपला पक्ष मजबूत होऊ शकला नाही. आता चिन्ह, झेंडा आपल्याकडे असून नागपूरच नव्हे तर विदर्भात पक्ष मजबूत केला जाईल. आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली जाईल असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. मोठ्या प्रमाणावर आज पक्षप्रवेश झाले त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यात काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विदर्भातील अनेक जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षही नेमले गेले. वेळेवर आले कॅबिनेट मंत्री झाले असा प्रफुल पटेल यांनी धर्मरावबाबा आत्राम यांचा उल्लेख करताना माजी मंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून अनेकदा टोलेबाजी केली. विमानतळावर केवळ स्वागताला येणाऱ्यामुळे, कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या कामासाठी येणाऱ्यांमुळे पक्ष मजबूत झाला नसल्याचे सांगितले. शिवसेनेसोबत सत्ता चालते मग भाजपसोबत का नाही, असा सवाल नाव न घेता पक्ष नेतृत्वाला केला. शिवसेना अडीच आणि राष्ट्रवादी अडीच वर्षे मुख्यमंत्री असा फॉर्म्युला आपण दिला मात्र शिवसेनेने चकार शब्द काढला नाही असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला.

या बैठकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते असे सांगितले. शिवसेना आमचा मित्रपक्ष कधीच नव्हता. केवळ मुख्यमंत्रीपद न दिल्याने भाजपशी फारकत घेणाऱ्यांनी मग राष्ट्रवादीला केलेला हा विरोध कसा खपवून घेतल्याचा आरोप केला. याचवेळी शरद पवार आमचे दैवत असून त्यांनी उजवा हात म्हणून खूप संधी दिली, आम्हीपण पक्षासाठी खूप काम केल्याचे सांगितले. शेवटी आमच्यावर विश्वास ठेवत तुम्ही इकडे आलात, चिंता करू नका, जुनी गर्दी कमी झाल्यावरच नव्या लोकांना संधी मिळते असेही सांगितले. डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रफुल पटेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आ राजेंद्र जैन, शहराध्यक्ष प्रशांत पवार, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, आभा पांडे, श्रीकांत शिवणकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *