लोकसभा निवडणुकीची आयोगाकडून पूर्वतयारी सुरू | महातंत्र

कोल्हापूर, महातंत्र वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात लगबग वाढली आहे. निवडणुका कधी होणार? याबाबत स्पष्ट सूचना नसल्या, तरी प्रशासनाला तयारी सुरू करण्याच्या सूचना असल्याने मुदतीपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका होणार का? या चर्चेला आता उधाण आले आहे. यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या, तरी त्या घेता येतील, याद़ृष्टीने प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे.

17 व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा 10 मार्च 2019 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत देशभर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप आठ महिन्यांचा कालावधी असताना निवडणूक विभागाने मात्र आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

नोडल अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज पूर्ण करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ (अधिकारी, कर्मचारी) उपलब्ध करणे, त्याबाबतची माहिती संकलित करणे, त्याबाबतचे आदेश काढणे आदींसह विविध कामकाजांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कामकाज सुरू झाले आहे.

मतदान केंद्रांची तपासणी सुरू

लोकसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना मतदान केंद्रांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आठ दिवसांत मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक सुविधांची स्थिती आदींबाबतची माहिती आयोगाला सादर करावी लागणार असून, ज्या केंद्रांवर सुविधा नाहीत, त्या उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह 1,500 पेक्षा जास्त मतदारसंख्या असल्यास नवे मतदान केंद्र तसेच एखाद्या केंद्रांची विविध कारणांनी दुरवस्था झाली असेल, तर नवे मतदान केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची, याबाबतचे प्रशिक्षणही अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू असून, आवश्यक साहित्य महिनाभरातही उपलब्ध होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.

प्रारूप मतदारयादी 10 ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. यानंतर या यादीवर हरकती, सूचना आल्यानंतर अंतिम मतदारयादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे. मात्र, तत्पूर्वीची मतदारयादीही ग्राह्य धरली जाऊ शकते, असेही निवडणूक विभागाचे म्हणणे आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, याद़ृष्टीने तयारी सुरू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास आवश्यक असणारे ईव्हीएम, मनुष्यबळ यांची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यामुळे या दोन्ही निवडणुका एकत्र होणार का? याबाबतही चर्चा सुरू आहे.

प्रशासनाची दोन-तीन महिने अगोदरच तयारी

निवडणूक विभागाकडून लोकसभा निवडणुकीची वर्षभर अगोदरच तयारी सुरू केली जाते. मात्र, त्याचे टप्पे ठरलेले असतात. त्या टप्प्यांचा विचार करता सध्या जे कामकाज सुरू आहे, ते लवकर सुरू केले आहे. यामुळे प्रशासनाने दोन-तीन महिने अगोदरतच तयारी सुरू केल्याने निवडणुका लवकर होतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

ईव्हीएमची ‘एफएलसी’ पूर्ण

लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता झाली असून, त्या ईव्हीएमचे ‘एफएलसी’ (फर्स्ट लेव्हल चेकिंग) पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर झाल्या, तरी ही ईव्हीएम वापरता येणार आहेत. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ‘एफएलसी’ झालेल्या ईव्हीएमची सरमिसळ करण्यात येईल. यानंतर ती मतदार केंद्रांसाठी निश्चित केली जातील.

The post लोकसभा निवडणुकीची आयोगाकडून पूर्वतयारी सुरू appeared first on महातंत्र.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *