प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांचे आवाहन: ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमातील लोकसहभाग वाढविण्यावर भर द्या

पुणे4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांवर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा आणि उपक्रमातील लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी केले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीस पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ.राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चावरे, डॉ.सुमंत पांडे, नरेंद्र चुग, पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, वन, जलसंपदा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले, राज्यातील प्रत्येक नदीशी जोडलेले विषय वेगळे असणार आहेत. त्यामुळे उपक्रमाची एक निश्चित कार्यपद्धती ठरवून जनजागृतीच्या उपाययोजना ठरवाव्यात. नदी संरक्षण आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित घटकांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. त्यातून समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे कार्यपद्धती निश्चित करावी. लोकसहभाग वाढवितांना जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा वापर करावा, समाजमाध्यमांवरून चांगले संदेश आणि होणाऱ्या कामांची माहिती प्रसारित करावी. उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या कामावर आधारित एकत्रित अहवाल तयार करावा आणि लोकसहभाग वाढविण्यासाठीच्या उपक्रमांवर विचार करावा.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, प्रदूषण कमी करणे, सुशोभिकरण आणि पूर नियंत्रण अशा तीन पातळीवर पुणे विभागात उपक्रम राबविण्यात येत आहे. विभागातील 20 नद्यांची प्राथमिकरित्या निवड करण्यात आली आहे. ‘नमामी चंद्रभागा’सारख्या उपक्रमाद्वारे नदी पात्राचा विकास करण्यासाठी काम करण्यात येत आहे. 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील प्रदूषीत पाणी नदीत जावू नये यासाठी ग्रामपंचायतीतील सांडपाण्याचे ऑडीट करण्यात येऊन शुद्धीकरणात असलेली तूट भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुण्यात ‘जायका’ योजनेच्या माध्यमातून सांडपाणी शुद्धीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राम नदीसारख्या महत्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि शहरातील नदीकाठी अनधिकृत पद्धतीने कचरा टाकणे बंद व्हावे म्हणून उपाय करण्यात आले आहेत.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *