अमरावती9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सर्वांनाच रोजगार उपलब्ध होणार नसल्याने विद्यार्थ्यांनी उद्योजक होऊन रोजगार क्षमता वाढवावी. त्यासाठी स्वतःमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव डॉ. विकास रस्तोगी यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘उद्योजकीय मानसिकता विकास’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर होते. तर जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक उदय पुरी, इ.सी.ए. इंडिया एनर्जी प्रा. लि. चे संचालक अमित आरोकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. दिपाली मालखेडे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. रस्तोगी पुढे म्हणाले, डॉ. मालखेडे यांनी सीबीसीएस व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये घेतलेला पुढाकार दिशादर्शक होता. हिततुल्य घटकांना विश्वासात घेऊन शैक्षणिक विकासामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या रूपाने विद्यापीठाला उच्चत्तम शैक्षणिक नेतृत्व लाभले होते. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम व अभ्यासक्रम त्यांनी तयार केले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या कार्याचे सरकारनेसुद्धा कौतुक केले होते. त्यांचा पुढाकार इतर विद्यापीठांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरला होता.
मोठे स्वप्न बघून त्याची पूर्तता करा : अमित आरोकार
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण होण्यासाठी माईंडसेट महत्त्वाचा आहे. माईंडसेट मधील पहिला भाग म्हणजे मोठमोठी स्वप्ने, वृत्ती, आव्हानांना सामोरे जाणे होय. समयसूचकता, इव्हेंट मॅनेजमेंटही त्यात समाविष्ट आहे. उद्योजकांना दररोज नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रत्येक क्षेत्रात आव्हाने व समस्या आहेत. त्यादृष्टीने माईंडसेट तयार व्हावा लागतो. दरवर्षी देशात लाखो विद्यार्थी तयार होतात, सर्वांसाठी रोजगार उपलब्ध असेलच असे नाही. अशाप्रसंगी युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे.
नामवंत उद्योजक म्हणून नावारूपास या : उदयपुरी
शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., यूपीएससी आदींबाबत पालकांकडून सांगितले जाते. परंतु उद्योजक व्हावे, यासाठी प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे. उद्योग करणे ही आता कोणाचीच मक्तेदारी नाही. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाक्षमता, महत्त्वाकांक्षा हे उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. स्टार्टअप, स्टँडअप, नाविन्यपूर्ण उद्योग सुरू केल्यास कमी वेळात नामवंत उद्योजक म्हणून आपण नावारूपास येऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्राव्दारे तांत्रिक प्रशिक्षण दिल्या जाते, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. दिवंगत डॉ. मालखेडे सरांनी विद्यार्थ्यांसाठी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.