पुणे : महातंत्र वृत्तसेवा : महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणार्या सुरक्षारक्षकांचे वेतन वेळेत मिळावे, यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांचे वेतन कार्यपद्धतीनुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेआधी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, कार्यालये आदी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. महापालिकेकडे कायम नोकरीतील सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने कंत्राटी पद्धतीने बहुउद्देशीय सेवकांच्या नावाखाली एक हजार 660 सुरक्षारक्षक घेतले आहेत. महापालिकेने केलेल्या करारानुसार ठेकेदाराने प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या कंत्राटी कामगारांचे वेतन देणे बंधनकारक आहे.
दरम्यान, यंदा निविदा प्रक्रिया राबवत दोन ठेकेदारांकडून प्रत्येकी 830 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. यापैकी एका ठेकेदाराने गेल्या महिन्यात 20 तारीख ओलांडून गेली तरीही पगार जमा केले नव्हते. ज्यांच्याकडे सह्यांचे अधिकार आहेत, त्यांच्याकडून विलंब होत असल्याने पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी काही कर्मचार्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक महिन्याची हजेरी 25 तारखेपर्यंत गृहीत धरण्यात यावी, संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी, विभागप्रमुखांनी त्यावर स्वाक्षरी करून 30 तारखेपर्यंत ही हजेरी ठेकेदाराकडे द्यावी. ठेकेदाराने त्यांच्याकडील कर्मचार्यांचे वेतन पाच तारखेपर्यंत बँकेत जमा करण्याची दक्षता घ्यावी. संभाव्य हजेरीमध्ये कर्मचारी गैरहजर राहिल्यास ही गैरहजेरी पुढील महिन्याच्या वेतनात नोंदवावी. संबंधित खात्याकडून मुदतीमध्ये हजेरी न मिळाल्यास यासाठी संबंधित खाते प्रमुख जबाबदार राहतील.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका