अमरावती4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘नामालूम’ या टोपण नावाने लेखन करणारे विदर्भातील सुप्रसिद्ध चिंतनशील कवी, गझलकार किशोर मुगल यांच्या नामालूम व बस युही या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. येथील वलगाव रोडवर चांगापूर येथे “मुगलसराय’ या नवनिर्मित वास्तूत हा कार्यक्रम घेण्यात आला. किशोर मुगल हे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
या मान्यवरांची उपस्थिती
प्रकाशन समारंभाला लेखक-समीक्षक संजय येरणे, शिवराम भोंडेकर, डॉ. प्रमोद काकडे, नितीन देशमुख, सुनील यावलीकर, प्रदीप देशमुख, अनिल लडे, गजेंद्र हिंगणकर, प्रदीप देशमुख, दिवाकर देशमुख, चंद्रकांत जाधव, राजेश राजगडकर, यशवंत मोहिते, नरेश बोरीकर, अजय पडघन, डॉ. विशाल इंगोले, संजय वाटाणे, शारदा मोरे, डॉ.अरुण मानकर, भूपेश नेतनराव, ललीत कदम, पवन नालट, बाबूभाई पटेल, प्रकाश वाघमारे, पुनाराम निकुरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी किशोर मुगल यांचा काव्यमय प्रवास तथा लेखन यावर उपस्थितांनी मनोगतातून कौतुकपर मांडणी केली. त्याला उत्तर देताना किशोर मुगल म्हणाले, मला जसे वाटते तसे मी लिहितो. अकोल्याचे कवी प्रकाश मोरे यांनी गझल लेखनाचे धडे दिल्याने त्यांच्या इच्छेनुसार हिंदी गझल संग्रह प्रकाशित करताना आनंद होत असला तरी आज ते या जगात नाहीत, याची सल मात्र कायम मनात राहील. या वेळी त्यांनी एक शेरही फर्मावला.
कहॉं अब किसी एक घर में रहे
चलो उम्र भर बस् सफर में रहे…
किनारे पे रहके बिखर जायेगी
कश्ती से कह दो भवॅंर में रहे…
कवी किशोर मुगल यांची आतापर्यंत एकूण ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यात “एक्कावन कविता माझ्याही”, “कालिंदीच्या डोहात”, दिवस निरुत्तर येतो”, “बस युही”, “नामालूम’ यांचा समावेश आहे. याप्रसंगी उपस्थितांना पुस्तके भेट देण्यात आली तर याप्रसंगी मुगलसराय या वास्तू निर्माण प्रक्रियेत ज्या कंत्राटदार, कामगारवर्गाचे परिश्रम लाभले त्यांच्याविषयी सामाजिक जाणिवा ठेवून त्यांचा तसेच किशोर मुगल यांच्या आई मंदाबाई, पत्नी नीता यांचादेखील यथोचित सत्कार करण्यात आला.