Pune news : इंदापूरच्या लोकांना साडेचार कोटींचा गंडा | महातंत्र








पुणे : प्रतिनिधी :  कंपनी भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करत असल्याचे सांगून गुंतवणूकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 9 जणांना तब्बल 4 कोटी पन्नास लाखांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात निरंजन नवीनकुमार शहा (वय 42, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड) याच्याविरुद्ध महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, शहा याला अटक करण्यात आली आहे. याबाबत ज्ञानेश्वर एकनाथ कदम (वय 41, रा. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम आणि आरोपी शहा हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. शहा याने कदम यांना त्याच्या ग्लोबल ट्रेडर्स, प्राईड ग्रुप आणि गुडवील ग्रुप या फर्म भारतीय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करतात असे सांगून, तुम्ही जर आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दुप्पट नफा, तसेच प्रतिमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांच्या इतर मित्रांनी तब्बल साडेचार कोटींची गुंतवणूक शहा याच्याकडे केली, मात्र काही कालावधीनंतर व्यवसायाचे नुकसान झाल्याचे कारण सांगून शहा यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी कदम आणि त्यांच्या मित्रांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जाच्या चौकशीअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.

 

 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *