वेल्हे : महातंत्र वृत्तसेवा : पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथे खडकवासला विधानसभा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने व राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी पिकांचे नुकसान, वीज, पाणी, पानंद रस्ते आदी समस्या मांडल्या. पानशेत सिंहगड भागातील शेतकर्यांसह कष्टकरी महिलां मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या.
रखडलेले पानंद रस्ते, संजय गांधी निराधार योजना, वीज कनेक्शन आदी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली. हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, अण्णासाहेब घोलप, चांगदेव नागरगोजे, नीलम भूमकर आदी विविध खात्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
खडकवासला युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सागर कोल्हे म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रलंबित प्रश्नाबाबत दर आठ दिवसांनी आढावा घेण्यात येईल. संयोजन सागर कोल्हे, युवकचे कार्याध्यक्ष शशिकांत किवळे, शुभांगी खिरीड, विशाल भालेराव, जावेद खान यांनी केले होते.
हेही वाचा
कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानास सुरूवात