पुणे : पीएमपी कर्मचार्‍यांना ‘नो डबल ड्युटी’ | महातंत्र

पुणे; महातंत्र वृत्तसेवा : ओव्हर ड्युटी केल्यामुळे मागील आठवड्यात दोन पीएमपी बसचा समोरासमोर अपघात झाला. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपीच्या चालकांना आता डबल ड्युटी देण्यात येणार नसल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्यातील 1100 ते 1200 बस ठेकेदारांच्या आहेत. तर 800 ते 900 बस पीएमपीच्या स्व:मालकीच्या आहेत. ठेकेदारांच्या आणि पीएमपीच्या बसगाड्यांवर बहुतांश चालक हे बदली, हंगामी रोजंदारी आहेत.

त्यांना काम मिळाले तरच पगार मिळतो. अशातच या चालकांना कधीतरी ओव्हरटाईम मिळाला, तर अधिकचे पैसे मिळावे, याकरिता ते ओव्हरटाईम करतात. त्यांना ठराविक महिन्याचा पगार नाही. घरसंसार सुरळीत चालावा, यासाठी हे चालक कशाचीही पर्वा न करता डबल ड्युटी करतात. परिणामी, अपघाताच्या घटना घडतात. मागील आठवड्यात झालेला बीआरटीचा अपघातदेखील यामुळेच झाला होता.

त्यात 25 ते 26 प्रवासी जखमी झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत, पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी यापुढे चालकांना डबल ड्युटी न देण्याचे आदेश दिले आहेत. चालक पीएमपीचा असो वा ठेकेदाराचा, कोणालाही यापुढे डबल ड्युटी देण्यात येणार नसल्याचे सिंह यांनी या वेळी सांगितले.

किमान वेतन कायद्याप्रमाणे चालकांना वेतन

पीएमपी चालक घर चालवण्यासाठी ओव्हर ड्युटी करत असल्याचे अध्यक्षांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी ठेकेदार आणि अधिकार्‍यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्यात यावा, अशा कडक सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात ठेकेदारांनासुद्धा तंबी देण्यात आली असून, त्याचे कडक पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

पीएमपीच्या प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेत कसर करून अजिबात चालणार नाही. त्यामुळे आम्ही चालकांना येथून पुढे ओव्हर ड्युटी न देण्याचे आदेश दिले आहेत. एकवेळ एखादी बस मार्गावर गेली नाही तरी चालेल, पण प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही.

सचिंद्र प्रताप सिंह,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *