पुणे : महातंत्र वृत्तसेवा : विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड करण्याचे धोरण निश्चित झाले आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शनिवारी (दि.26 ) याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर प्र-कुलगुरू म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. कुलगुरूंच्या निवडीनंतर तीन महिने होत आले, तरीही त्यावर निर्णय झाला नव्हता. प्र-कुलगुरुपदासाठी डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, डॉ. अशोक चासकर, डॉ. संजय चाकणे यांची नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. त्यामुळे प्र-कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वी विद्यापीठाचे कुलपती अर्थात राज्यपालांकडून प्र-कुलगुरूंची निवड केली जात होती. परंतु, विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार डॉ. काळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत आहेत. काळकर हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या शर्यतीत होते. पहिल्या पाच उमेदवारांमध्ये ते आले होते. आता त्यांना प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने यापुढील काळात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. विद्यापीठाचे घसरलेले रँकिंग, उशिरा लागणारे निकाल, विद्यापीठातील विविध विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवाव्या लागणार्या उपाय योजना आदींचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे.
निवडीला वादाची किनार…
डॉ. पराग काळकर हे कुलगुरुपदाच्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये असतानाही अनेक संघटनांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. आत्ता देखील ज्यावेळी त्यांचे नाव प्र-कुलगुरुपदासाठी निश्चित झाले त्या वेळी त्यांच्या नियुक्तीला काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. एखाद्या व्यक्तीवर गुन्हा नोंद असताना संबंधित व्यक्तीची निवड प्र-कुलगुरुपदी होते, हे केवळ राजकीय दबावापोटी झाले असल्याचे मत काही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
प्र-कुलगुरूपदासाठी संधी दिल्याबद्दल कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांचे मन:पूर्वक आभार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीत सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरणाची संलग्न महाविद्यालामधील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील सर्व महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवण्यास कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे.
डॉ. पराग काळकर, नवनिर्वाचित, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
हेही वाचा :