रायगड : बहिणीने यकृत दान करत भावाला दिली रक्षाबंधनाची अनोखी भेट | महातंत्र








पनवेल, महातंत्र वृत्तसेवा : भाऊ आणि बहिणीचे नाते हे पवित्र आणि अतूट असते. अशाच एका २१ वर्षीय बहिणीने ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या आजाराशी लढा देत असलेल्या आपल्या १७ वर्षीय भावासाठी किडनी दान करून रक्षाबंधनची अनोखी भेट दिली. डॉ. विक्रम राऊत, संचालक, यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.

रुग्णाचे वडिल संतोष पाटील हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्यांची आई घरकाम आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याकरिता ते पुण्यात आले. या जोडप्याला दोन मुले आहेत. त्यापैकी नंदिनी ही त्यांची मोठी मुलगी जी सध्या महाविद्यालयात शिकत आहे तर, राहुल हा त्यांचा धाकटा मुलगा आहे जो आता दहावीला आहे. राहुलला अचानक अशक्तपणा जाणवू लागला आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, तेव्हा हे संपुर्ण कुटुंब घाबरले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली पण त्याने फारसा फरक पडला नाही. अखेर ते नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये पुढील उपचाराकरिता दाखल झाले. तेव्हा असे आढळले की राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस आहे आणि यकृत प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे.

डॉ. विक्रम राऊत(संचालक, यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई )सांगतात की, ऑटोइम्यून यकृत रोग क्वचितच लहान मुलांवर परिणाम करतात आणि ते वयाच्या २ वर्षांपर्यंत दिसून येतात. ऑटोइम्यून यकृत रोगात, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृत पेशींच्या विरूद्ध कार्य करण्यास सुरवात करते. जर लवकर निदान झाले तर औषधांनी उपचार केले जाऊ शकतात. परंतु, राहुलच्या बाबतीत उशीरा निदान झाले आणि त्याला वारंवार रक्तस्त्राव, जलोदर (ओटीपोटात द्रव जमा होणे) आणि कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. रुग्णाची आई HbsAg पॉझिटिव्ह आढळल्याने तिला दाता म्हणून नाकारण्यात आले. रुग्णाची २१ वर्षीय बहीण नंदिनी पाटील किडनी दानाकरिता पुढे सरसावरी आणि संपूर्ण तपासणीनंतर ती त्यास पात्र ठरली.

डॉ राऊत पुढे सांगतात की, रुग्णाच्या बहिणीने आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता तिचे यकृत दान केले. आम्ही तिच्या यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली जी राहुलच्या यकृताशी पूर्णपणे जुळत होती. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला जीव गमवावा लागला असता. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते मात्र त्यासाठी प्रत्यारोपण न थांबविता मेडिकवर हॉस्पिटल आणि इतर सेवाभावी संस्थांनी मदत केली. २६ जून २०२३ रोजी ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता दाता आणि रुग्ण या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. प्रत्येकाने अवयव दान करावे असे आवाहन मेडिकवर हॉस्पीटल्सकडून करण्यात आले आहे. निरोगी व्यक्ती कोणत्याही नकारात्मक परिणामांशिवाय त्यांचे यकृत सुरक्षितपणे दान करू शकते असेही डॉ राऊत यांनी स्पष्ट केले. माझा भाऊ हाच माझ्यासाठी संपुर्ण जग आहे. रक्षाबंधनाला मी त्याला एक मौल्यवान भेट दिली याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत होतो. मात्र आता माझ्या भावाला नवे आयुष्य मिळाले असून आम्ही सर्वच खुप खुश आहेत अशी प्रतिक्रिया रुग्णाची बहीण नंदिनी पाटील हिने व्यक्त केली. माझ्या बहिणीने मला रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. माझी बहीणच माझा कणा आहे आणि तिने केलेल्या अमुल्य दानाबाबत मी आयुष्यभर ऋणी राहिन. तिच्यामुळेच आज मला नवे आयुष्य मिळाले आहे ,अशी प्रतिक्रिया रुग्ण राहुल पाटील याने व्यक्त केली.

हेही वाचलंत का?









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *