छत्रपती संभाजीनगर21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर शहरात साधारण एक ते दीड महिन्यांपूर्वी मानकापे पाटील यांच्या आदर्श पतसंस्थेचा सुमारे 200 कोटींचा घोटाळा समोर आला. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करत संस्थेशी संबंधितांना अटक करण्यात आले.
दुसरीकडे मोंढा नाका परिसरातील अजिंठा पतसंस्थेवर देखील एक दिवसांपूर्वी आरबीआयच्या वतीने निर्बंध लावण्यात आल्याने ठेवीदार गोंधळात पडले आहे. अशातच आता शहरातील आणखी एका पतसंस्थेवर लागलेल्या निर्बंधाचे प्रकरण सामोरे आले.
त्यामुळे या पतसंस्थेतील खातेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत हा प्रश्न मार्गी लावावा. आमच्या समस्येला संसदेत वाचा फोडावी, अशी मागणी केली आहे.

राजस्थान आदर्श मल्टिस्टेटच्या खातेदारांनी खा. जलील यांची भेट घेऊन सर्व समस्या मांडल्या.
आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (मल्टिस्टेट) राजस्थानच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांच्या कोट्यवधीच्या ठेवी अडकल्या आहेत. या पतसंस्थेवर देखील केंद्र शासनाने निर्बंध घातल्याने येथील ठेवीदार अडचणीत आले आहेत. या सर्व खातेदार-ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीचे निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले की, तुरूंगात असलेल्या अध्यक्षांसह संचालकांना सोडल्यास ठेवीदारांना पैसा परत मिळू शकतो, मल्टिस्टेट पतसंस्थेतवरील निर्बंध हटवणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खासदार जलील यांनी हा प्रश्न संसदेत मांडून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी अशोक भुतडा, शिवनाथ राठी, दिनेश नरवडे, राजेंद्र अजमेरा, डॉ. जोशी, पंकज कदम, अण्णा सुर्यवंशी, उत्तम फालके, संतोष म्हस्के, अशोक येवले, दायमाजी, शिंगांडे यांच्यासह अनेक ठेवीदारांची उपस्थिती होती.
संसेदत आवाज उठविणार – जलील यांचे आश्वासन
आपल्या शहरातील आदर्श बॅकेतील घोटाळा पुढे आल्यानंतर लोकांच्या पाठीशी मी उभा राहिलो. आता आणखी एका बॅंकेचा घोटाळा समोर आलेला आहे. ती बॅंक म्हणजे राजस्थान आदर्श बॅंक आहे. या बॅंकेचे अध्यक्ष, संचालकांनी घोटाळा करून कोट्यवधी रुपये लोकांचे हडपले. परंतू जास्त व्याज देऊ असे आश्वासन देऊन अनेकांनी या बॅंकेमध्ये आयुष्याची कमाई टाकली. परंतू अध्यक्ष व संचालकांनी फ्रॉड करून लोकांना फसवले आहे. या बॅकेंच्या राजस्थान सह सर्व देशातील राज्यांमध्ये शाखा आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात देखील अनेक शाखा असून हजारो लोक ठेवीदार, खातेदार अडचणीत आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या बॅंकेच्या विरोधात ठेवीदारांचे शिष्टमंडळ काम करत आहे. त्यांचा पैसा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. आता मी देखील यासंदर्भात केंद्राकडे पत्र लिहणार आहे. यासंदर्भात संसदेत आवाज उठवून खातेदारांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी दिले.
काय आहे नेमका प्रकार?
राजस्थानच्या आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर शासनाने निर्बंध लावलेले आहेत. 2018 साली या बॅंकेवर केंद्र शासनाच्या वतीने निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना त्यांचा पैसा मिळत नाही. आदर्श बॅंकेच्या 29 राज्यात 809 पेक्षा अधिक शाखा आहेत. या बॅंकेत सुमारे 21 लाखांपेक्षा अधिक सदस्य देखील जोडले गेलेले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात किती शाखा
राजस्थानच्या आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील शाखा आहेत. यात हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपये अडकले आहेत. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर शहर, पैठण, कन्नड, गंगापूर तसेच जालना जिल्ह्यातील ठेवीदारांचे देखील या शाखांमध्ये पैसे अडकलेले आहेत.
खा. जलील यांनाच निवेदन का?
आदर्श पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली. खातेदारांच्या सोबतीने त्यांनी मोठे आंदोलन केले. तसेच त्यांनी बॅंकामधील भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील संसदेत मांडला. खातेदारांना त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय आपण शांत राहणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राजस्थान ‘आदर्श’ मल्टिस्टेट संदर्भातील खातेदारांना देखील इम्तियाज जलील यांना विश्वास वाढला आहे. तर येत्या काळात संसदेत प्रश्न मांडून सरकारच्या निदर्शनात ही बाब आणून देऊ, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी खातेदारांच्या शिष्टमंडळाला दिला आहे.