पुणे
पुणे, महातंत्र वृत्तसेवा : तरुणांनी सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी समजून तिच्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी शनिवारी (दि.२८) केले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या भारतीय रेल्वे सिव्हील इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या उपस्थितीत पुणे विभागात ८० जणांना यावेळी सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली.
दरम्यान, देशभरात ५१ हजार जणांना तर मध्य रेल्वेअंतर्गत ४९२ जणांना नियुक्ती पत्रे शनिवारी देण्यात आली. यावेळी आमदार सुनिल कांबळे माजी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु दुबे, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह व अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, सरकारच्या कारभारात आता पूर्णपणे पारदर्शकता आली असून, त्यामुळेच केवळ गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी मिळण्याची पद्धत अमलात आली आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असून त्यावेळी जगाच्या पाठीवर विकसित आणि सर्वार्थाने बलाढ्य देश म्हणून भारताची ओळख संपूर्ण जगाला व्हावी, यासाठीचे नियोजन आत्तापासूनच सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोचली असून, आगामी २५ वर्षात आणखी खूप काही बदल होणार आहेत. सक्षम नेतृत्व असेल तर देशात अनेक चांगल्या व्यवस्था निर्माण होऊ शकतात हे गेल्या ९ वर्षात देशवासीयांनी अनुभवले आहे.
हेही वाचलंत का?