नवी दिल्ली, महातंत्र वृत्तसेवा : रिझर्व्ह बँकेने पुण्यातील मर्सिडीज-बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला दहा लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. सदर कंपनीने ग्राहक माहिती निर्देश २०१६ संबंधी तरतुदींचे पालन न केल्यामुळे ३० ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाद्वारे हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेला दिलेल्या अधिकारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे.
मर्सिडीज-बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची वैधानिक तपासणी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०२१ रोजीच्या तिच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात केली होती. जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि इतर गोष्टींबरोबरच संबंधित सर्व पत्रव्यवहाराची तपासणी केली होती.
३१ मार्च २०२१ रोजी कंपनीने आपल्या उच्च जोखमीच्या ग्राहकांच्या ग्राहक माहितीचे नियतकालिक अद्ययावत न केल्यामुळे, त्याच्या ग्राहकांची सतत योग्य काळजी घेण्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली. मात्र याबद्दल कंपनीने दिलेले उत्तर आणि सादर केलेले कागदपत्रे समाधानकारक न आढळल्याने त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली.