निवृत्त अधिकारी सुनील केंद्रेकारांना ‘बीआरएस’ची ऑफर; थेट शेतात झाली भेट

Sunil Kendrekar BRS Offer : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. प्रशासनातील एक चांगला अधिकारी सेवेतून बाहेर पडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, शासकीय सेवेतून बाहेर पडलेले केंद्रेकर आता काय करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, केंद्रेकर राजकारणात येणार असल्याची देखील चर्चा झाली. अशातच आता बीआरएस (BRS) पक्षाच्या नेत्यांनी केंद्रेकर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावर केंद्रेकर किंवा बीआरएस पक्षाकडून कोणतेही अधिकृत प्रतिकिया आलेली नाही. 

मराठवाड्याचे निवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख माणिक निकम यांनी भेट घेतली आहे. परभणी जिल्ह्यातील झरी येथील त्यांच्या मुळगावी शेतामध्ये ही भेट झाली. केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांना मदतसाठी जो सरकारला अहवाल दिला होता, त्या अहवालाबाबत बीआरएस पक्षाच्यावतीने केंद्रेकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे, सुनील केंद्रेकर राजकारणात जाणार अशी चर्चा असतानाच बीआरएसच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोबतच आमच्या पक्षात यावे अशी विनंती करत बीआरएस पक्षाने केंद्रेकरांना ऑफर दिल्याची देखील चर्चा पाहायला मिळत आहे. तर, केंद्रेकरांनी मात्र ही ऑफर नाकारल्याची माहिती मिळत आहे.

Related News

केंद्रेकरांनी निवृत्तीचा निर्णय का घेतला? 

मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. तसा रिपोर्ट सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळख…

राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची नेहमी चर्चा असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्यात केंद्रेकर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली आणि अख्खा बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक व्हीआरएस घेतल्याने त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाही.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *