‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून रोहित पवारांचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल; केला गंभीर आरोप

बीड : शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा सध्या बीडमध्ये (Beed) असून, त्यांनी बीडमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सांगण्यावरून हे कार्यक्रम होत आहे. त्यामुळे, बीडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गर्दी होणार असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.       

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी शासन आपल्या दारी कार्यक्रमासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीमध्ये 3 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम परळी येथे घेण्याचे ठरले आहे. याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे परळीमध्ये येणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील दोन वेळा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव दोन्ही वेळा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, आता तीन डिसेंबरचा मुहूर्त या कार्यक्रमाला मिळाला असून, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. 

Related News

यापूर्वी दोन वेळा कार्यक्रम रद्द करावा लागला…

यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात दोन वेळा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले, मात्र, वेगवेगळ्या कारणांनी कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. ज्यात, बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन, त्याचबरोबर शिवसेनेच्या 16 आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिका यावर सुरू असलेली सुनावणी, सोबतच या कार्यक्रमासाठी स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध, तसेच, कार्यक्रमावर होणारा खर्च यावर देखील टीका झाल्याने दोन वेळा शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करावा लागला. आता परळीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असून, यापूर्वी पावसाळ्यात हा कार्यक्रम होणार असल्याने जास्त निधीची गरज पडत होती. मात्र, पूर्वीच्या निधीपेक्षा आता कमी खर्चात हा कार्यक्रम होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना

या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक विभागाचे स्टॉल उभे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या खर्चाचे नियोजन अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचा देखील सांगण्यात आले आहे. सोबतच, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी, भंडाऱ्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात गोंधळ

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *