मुंबई13 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना फोन करून शिवीगाळ केली होती. किशोर पाटील यांना पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकीही दिली होती. याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली होती. या धमकीनंतर आता पत्रकाराला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला घेरले आहे.
आमदार रोहित पवार यांनी संदीप महाजन यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रिपोर्टींग करून घरी परतणाऱ्या महाजन यांना काही लोक रस्त्यात अडवून, खाली पाडून मारहाण करताना दिसताहेत. हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात पाणी
रोहित पवार म्हणाले की, पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्यसरकारवर निशाणा साधला. पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून…विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली. त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल, असेही त्यांनी म्हटले.
ही सत्तेची नशा?
रोहित पवार म्हणाले की, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे.असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे, असेही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रिट्विट करण्यात आले आहे. लोकशाही प्रदान देशात सत्य लोकांपुढे मांडणाऱ्या पत्रकाराला अशी अमानुषपणे मारहाण होणे दुर्दैवी आहे. पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.