विटा; महातंत्र वृत्तसेवा : विट्याच्या अस्मितेचा, परंपरेचा, आपुलकीचा एक भाग बनलेला उत्सव समितीचा हत्तीला उपचारासाठी जामनगर (गुजरात) येथे पाठविण्यात येणार आहे. या प्राण्याच्या जीवाची काळजी म्हणून हा निर्णय घेतला आहे, तरी हा विषय भावनिक न करता सर्वांनी साथ द्या अशी साद येथील श्रीनाथाष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विटेकरांना घातली आहे.
याबाबत माजी आमदार पाटील म्हणाले, लाेकनेते हणमंतराव पाटील यांनी विट्यातील लाेकांच्या मागणीनुसार यात्रा कमिटीच्या मालकीचा माेहन नावाचा हत्ती पहिल्यांदा आणला हाेता. त्या हत्तीला विटेकरांनी भरभरून प्रेम दिले हाेते. परंतु अचानक २००० साली मेंदूज्वराने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व विटेकर हळ हळहळलेे हाेते. त्यानंतर सर्व विटेकरांच्या आग्रहानुसार पुन्हा सन २००७ मध्ये ७ वर्षे वयाचा गणेश हत्ती आणला. याही हत्तीला सर्व विटेकरांनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे विटेकरांना त्याचा लळा लागल्याने गणेश हत्ती विट्याचे वैभव बनला हाेता. मात्र गेल्या काही महिन्या पासून हा गणेश हत्ती मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर गेल्या महिन्याभरात पशुवैद्यकीय अधिकारी आणि शिमाेग्यातील तज्ञ डाॅक्टरांच्या माध्यमातून शिवाय माहुताच्या प्राचीन पुस्तकांत, ग्रंथातील उपचार पध्दती नुसार अनेक उपाय केले. परंतु त्याच्या प्रकृतीत अपेक्षित फरक पडत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी गुजरात येथील जामनगर मधील राधाकृष्ण टेम्पल ट्रस्टच्या अत्याधुनिक एलिफंट क्युअर सेंटरला पाठविण्याचा निर्णय आम्ही यात्रा समितीच्या वतीने घेतला आहे.
राधाकृष्ण टेम्पल ट्रस्टच्या अत्याधुनिक इलेंफट क्युअर सेंटर हे देशातील एकमेव अत्याधुनिक हत्तीवर उपचार करणारे सेंटर असून तेथे २०० च्या वर हत्तींना बरे केले आहे. तेथे हत्तींचे संगाेपन आणि उपचार केले जात आहेत. या सेंटरमध्ये त्याच्यावर चांगल्या पध्दतीने उपचार हाेऊन गणेश हत्ती लवकरात लवकर बरा हाेईल. या हत्तीवर सर्व विटेकरांचे जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे गणेश हत्ती जरी विटावासि यांच्या दृष्टीने भावनेचा विषय असला तरी त्याचा जीव वाचणे महत्वाचे आहे. त्यामुळे यात्रा समितीच्या निर्णयाला सर्वांनी साथ द्या असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.यावे ळी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव आप्पा पाटील, जेष्ठ नेते गंगाधर लकडे, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, विटा अर्बनचे व्हाईस चेअरमन विलास कदम, विश्वनाथ कांबळे, भरत कांबळे, सुभाष मेटकरी, कैलास भिंगारदेवे, बाळासाहेब निकम यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.