पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या ३ उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित प्रकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या मेळाव्यासाठी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली केली होती. तसेच उद्योजकांनी विविध पात्रतेच्या रिक्त पदांची मागणी नोंदविली होती. या महारोजगार मेळावा कार्यक्रमामध्ये ५ हजार ३९५ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३२ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये १ हजार २९ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यानुसार सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ६३९ उमेदवारांची निवड करण्यात आली.

नागरिकांचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
जेजुरी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या दालनांमध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डोळ्यांची तपासणी, मोफत आयुष्यमान भारत कार्ड विशेष मोहीम, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, समाज कल्याण विभागामार्फत शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, यशवंत निवास घरकुल योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान आदी योजनांची माहिती देण्यात आली.