शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, हुशार माणूस आहे पण…; जीवलग मित्र सायरस पूनावाला यांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पूनावाला यांनी दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं. सायरस पूनावाला यांनी अशावेळी विधान केलं आहे, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांसह गेलेल्या नेत्यांचंही शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी असं मत जाहीरपणे मांडलं आहे. त्यातच आता सायरस पूनावाला यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे. 

सायरस पूनावाला यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचं कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला. शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. 

“शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. त्यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते फार हुशार असून, जनतेची सेवा करु शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घ्यावी,” असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

Related News

शरद पवारांनी जाहीर केली होती निवृत्ती

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी (2 मे 2023) निवृत्ती जाहीर केली होती. राजकीय जीवनात तीन वर्षे शिल्लक असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवारांनी केली होती. शरद पवारांच्या या निर्णयाला मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण यावरुन अजित पवार नाराज झाले आणि बंड पुकारत भाजपात सहभागी झाले. 

तुम्ही निवृत्त कधी होणार? अजित पवारांनी केली होती विचारणा

अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांना तुम्ही निवृत्त कधी होणार आहात? अशी विचारणाच केली होती. “कॉर्पोरेट नोकरीत निवृत्तीचं वय 58 असतं. अधिकाऱ्यांसाठी 60 वर्षं आहे. भाजपात 75 वर्षानंतर निवृत्त केलं जातं. मग तुम्ही निवृत्त कधी होणार? 2 मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो सांगितलं होतं. मग अचानक निर्णय मागे का घेतला? मागे घ्यायचा होता तर मग राजीनामा कशाला दिला?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

“शरद पवार यांना नेमका कशाचा हव्यास आहे? वय वर्ष 82 झालं तरी ते थांबण्याचं नाव घेत नाहीत. ते निवृत्त का होत नाही?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली होती. 

 

शरद पवारांचं उत्तर

अजित पवारांच्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं होतं. “कुणी 82 म्हणो की 92 … मी जोपर्यंत सक्षम आहे, माझं काम जोमाने करत राहणार, इथे थांबणे नाहीच”, असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *