file photo
कोल्हापूर, महातंत्र वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटी प्रकरणी शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेने बडतर्फीची कारवाई करीत बडगा उगारला आहे. सेवेतून बडतर्फ केलेल्यांमध्ये अधीक्षक रवींद्र भोसले, क्लार्क सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील आणि विशाल पाडळकर यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात एका संस्थेने ऐवढी मोठी कारवाई करण्याची पहिलीच घटना आहे.
विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षेतंर्गत ३१ मे २०२३ रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिवाजी विद्यापीठाने याची तात्काळ गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीमार्फत चौकशी सुरु केली. गेले दोन महिन या प्रकरणाची चौकशी सुरू होती. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
दरम्यान, शहाजी कॉलेज व्यवस्थापनाने साऱ्या प्रकाराची दखल घेतली. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी जूनमध्ये संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी त्रि-सदस्यीय समिती नेमली. चौकशी समितीकडून प्रकरणाची शहानिशा, तपास सुरु झाला. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीची चौकशी सुरु होती. दोन महिने याप्रकरणी चौकशी, संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब, कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया सुरु होती. संस्थेने नेमलेल्या समितीचा अहवाल जुलै महिन्याच्या अखेरीस आला. त्यानंतर विद्यापीठ परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन त्यांच्यावर सेवाशर्तीनुसार शिस्तभंगाची कारवाईची शिफारस ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात संस्था प्रशासनास केली.
काही सिनेट सदस्यांनीही याबाबत संबंधित कारवाई करावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल कॉलेजला प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करुन चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या निर्णय घेतला. संस्था व कॉलेज व्यवस्थापनने मंगळवारी चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेला १२५ वर्षाची मोठी शैक्षणिक परंपरा आहे. शहाजी महाविद्यालयास ५० वर्षपूर्ण झाली आहेत. अशा पद्धतीचे कृत्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी करणे संस्थेच्या लौकिकास बाधा आणणारे अशा भावना संस्था चेअरमन यांची सुरुवातीपासून होती. त्यामुळे या कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर संस्थेने नियमानुसार कारवाई करीत समाजात वेगळा पायंडा पाडला आहे.
– डॉ. राजेखान शानेदिवाण, प्राचार्य, शहाजी कॉलेज
हेही वाचंलत का?