न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा दिलासा! शोएब अख्तर चेकाळून म्हणाला, ‘वर्ल्ड कप अजून…’

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेने (NZ vs SA) बुधवारी आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्डकपच्या 32व्या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शोएब अख्तरने असा काही प्रश्न विचारलाय की त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वर्ल्डकपचे (World Cup) सामने अजून सुरु आहे का असा सवाल शोएब अख्तरने केला आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. या पराभवांमुळे बाबर आझमचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप संपल्यात जमा होता. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून परिस्थिती सुधारल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पुन्हा वाढल्या आहेत. मात्र अशातच शोएब अख्तरने अशी पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानने पहिल्या दोन सामन्यात नेदरलँड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून वर्ल्डकपची चांगली सुरुवात केली होती. पण भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. भारताकडून सामना हरल्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्यांच्या उपांत्य फेरी पोहोचण्याच्या आशा मावळल्या होत्या. मात्र सेमीफायनलसाठी तीन सामने जिंकण्याबरोबरच पाकिस्तानला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना पुढील दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. या दोघांपैकी न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्ध एक सामना आहे जो व्हर्च्युअल नॉकआउट म्हणून खेळवला जाईल.

Related News

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडचा पराभव पाकिस्तानसाठी जीवनदान ठरलं आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल असे वाटत असलेला पाकिस्तान आता अंतिम चारचा मोठा दावेदार बनला आहे. न्यूझीलंडचे सध्या 7 सामन्यांतून 8 गुण आहेत आणि पाकिस्तानचे 7 सामन्यांतून 6 गुण आहेत. या दोन संघांमध्ये 4 नोव्हेंबरला बंगळुरू येथे सामना होणार आहे. जर पाकिस्तानने बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला तर त्याचे 8 गुण होतील. न्यूझीलंडचेही 8 सामन्यांत केवळ 8 गुण होतील. जर पाकिस्तानने तो सामना 83 धावांनी जिंकला किंवा 35 षटकांपूर्वी लक्ष्याचा पाठलाग केला तर तो नेट रनरेटच्या बाबतीतही न्यूझीलंडला मागे सोडेल.

दरम्यान, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक आणि रॅसी डुसेन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 4 गडी गमावून 357 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 35.3 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 167 धावा करू शकला. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा हा सलग तिसरा पराभव आहे, याआधी न्यूझीलंडचा भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *