सातारा5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वाई येथील न्यायालयात सोमवारी दुपारी न्यायालय कक्षाबाहेर व्हरांड्यात खंडणी व दरोडा प्रकरणातील मोक्का लागलेला आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव व त्याच्या साथीदारांवर एकाने गोळीबार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळजनक उडाली.
कोठडी संपल्याने बंटीला आणले होते कोर्टात
पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यास रात्री उशीरापर्यंत सुरू होती. गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात व शहरात नाकाबंदी करण्यात आली. राजेंद्र चंद्रकांत नवघणे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मेणवली (ता वाई) येथील हॉटेल माधवन इंटरनॅशनल च्या मालकास दि 1 जून 2023 रोजी दहा लाखांची खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पंधरा जणांवर वाई पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कुविख्यात गुंड व मोक्का लागलेला आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव, (भुईंज, निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (गंगापुरी) यांना कळंबा कारागृहातून ताब्यात घेऊन शनिवार (दि. 5) रोजी न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलिस कोठडी संपल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पोलिस बंदोबस्तात फिर्यादीनेच केला हल्ला
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी. व्ही. शिरसाट यांच्या न्यायालयात कामकाज सुरू असल्याने त्यांना न्यायालय कक्षाबाहेर व्हरांड्यात बसविण्यात आले होते. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. वकील आरोपीशी चर्चा करत होते. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या एकाने फाईल मध्ये दडवलेल्या पिस्तुलातून दोन गोळ्या आरोपींवर झाडल्या. यावेळी त्याला पोलिसांनी हटकल्याने गोळी भिंतीवर व जमिनीवर लागली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी जाग्यावरच ताब्यात घेतले. यावेळी तो फिर्यादी राजेंद्र चंद्रकांत नवघणे असल्याचे समोर आले.
न्यायालयाचे सर्व दरवाजे केले बंद
त्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. न्यायालयातून कोणी पळून जाऊ नये म्हणून न्यायालयाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. न्यायालयाबाहेर व शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला व नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी पिस्तूल सह न्यायालयाबाहेर पळून गेल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने न्यायालय परिसरातही मोठी गर्दी वाढली होती पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण केले.

गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. एस. अदकर हे साताऱ्यातून वाई न्यायालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश एस जी नंदिमठ पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी चर्चा केली. ताबडतोबीने पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी घटनास्थळी धाव घेऊन यांनी तपास कामी मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज कृष्णकांत पवार यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. गोळीबार करणाऱ्या राजेंद्र नवघणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.