एकाकडेच सहा जिल्ह्याचं पालकमंत्री पद असल्याने जिल्ह्यांचे नुकसान; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे

भंडारा : एका मंत्र्याकडेच सहा-सहा जिल्ह्याचं पालकमंत्री पद असल्याने जिल्ह्याचे नुकसान होत असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. भंडाऱ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. मी सरकारमध्ये असलो तरी सरकार थोडं चुकत असल्याची स्पष्टोक्ती आमदार बच्चू कडू यांनी दिली. 

भंडाऱ्यात वनविभागाकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासा विरोधात प्रहार पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. बच्चू कडू यांनी म्हटले की, पालकमंत्री हे प्रत्येक जिल्ह्याला दिलंचं पाहिजे. यामध्ये सरकार थोडं चुकत आहे. तुम्ही कोणालाही पालकमंत्री करा, पण एकाकडे सहा-सहा जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिल्यानं नुकसान होत आहे, त्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, अशी खदखद बच्चू कडू यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यात पुराच्या फटक्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र, त्यांनी जिल्ह्याला भेट दिली नाही. त्यांनी हे भाष्य केले. 

तर फुटाफुटीची वेळच आली नसती….आम्ही कुठं इथं भटकलो असतो

एखाद्याच्या कानाखाली मारली तर लहान गुन्हा दाखल होते आणि एखाद्याला मारून टाकलं तर त्याची चौकशी होते. एखाद्यावर चुकीनं खुनाचा गुन्हा दाखल केल्यास त्याचं आयुष्य उद्धवस्त होते, असे सांगत बच्चू कडू यांनी आमदार अपात्रतेच्या कारवाईवर भाष्य केले. आमदारांवर अपात्रतेची कारवाई करताना चौकशी करण्यासाठी तारीख पे तारीख नाही तर, एखाद्यावेळेस वर्ष ही लागू शकते, असे त्यांनी म्हटले. आमदाराला अपात्र करायचे असेल तर त्याला वेळ लागणारच आहे, ती लहान गोष्ट थोडी आहे. विरोधकांना याची एवढी घाई झाली आहे, ही कधी अपात्र होते, कधी आम्ही जिंकतो, असं त्यांना झाले असल्याचे कडू यांनी म्हटले. अपात्रतेच्या कारवाईपेक्षा काही गोष्टींवर लक्ष दिले असते तर ही फुटाफुटीची वेळच आली नसती असे बच्चू कडू यांनी म्हटले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती केली. हे काम आधी केलं असतं तर आम्ही कुठंच गेलो नसतो, असेही त्यांनी म्हटले. 

दहशतवाद्याची व्याख्या नाना पटोले यांना माहीत नसेल, त्यांनी समजावून घ्यावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुपर आतंकवादी असल्याची टीका काल भंडाऱ्यात केली होती. यावर बोलताना बच्चू कडू यांनी, इतक्या खालच्या स्तरावरची टीका करू नये असे म्हटले. दहशतवाद्याची व्याख्या नाना पटोले यांना माहीत नसेल, त्यांनी आतंकवाद्याची व्याख्या समजावून घ्यावी. एखाद्याला विरोध असणे हे ठीक आहे. कुठल्या टोकावरच्या टीका केल्या पाहिजे, याच्याही काही मर्यादा पाळल्या पाहिजेत असेही बच्चू कडू यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *