सिंधुदुर्ग : गट शिक्षणाधिकारी कार्यालयात भरवली शाळा; हेवाळे ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन | महातंत्र
दोडामार्ग, महातंत्र वृत्तसेवा : हेवाळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक द्यावा, या मागणीला येथील गटशिक्षणाधिकारी यांनी वारंवार आश्वासनाचे गाजर दाखविल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाल्यांना आणून शाळा भरविली. एकतर शिक्षक द्या, अन्यथा बाबरवाडी प्रमाणे हेवाळे येथीलही शाळा बंद करून टाका. आम्ही ग्रामस्थ आपल्या प्रशासनाला वारंवार सहकार्य करून देखील आपण मात्र आमच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे करीत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला.

हेवाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन प्राथमिक शिक्षक कार्यरत होते. मात्र आंतरजिल्हा बदलीमुळे ही शाळा शून्य शिक्षकी झाली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सजग असलेल्या पालक व ग्रामस्थांच्या मनात धडकी भरली. त्यामुळे आमच्या शाळेतील दोन्ही शिक्षक आम्हाला परत द्या, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले. अखेर तेथे एका शिक्षकाला नियुक्त केले. दुसरा शिक्षक लवकरच नियुक्त होईल या आशेवर तेथील पालक व ग्रामस्थ होते. मात्र दुसरा शिक्षक शाळेत हजर न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.

सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, सचिन देसाई, गुरु देसाई व ग्रामस्थांनी येथील गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांची भेट घेत दुसरा शिक्षक लवकरच द्यावा अशी मागणी केली. तसेच हा शिक्षक उपलब्ध न झाल्यास ८ ऑगस्ट रोजी मुलांना येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात आणून शाळा भरविली जाईल असा इशाराही दिला होता. मात्र याची दखल घेतली न गेल्याने मंगळवारी अखेर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाल्यांना आणून हेवाळेवासियांनी शाळा भरवत आंदोलन छेडले. यावेळी दोडामार्ग मुख्य चौक ते गटशिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत मुलांनी पदयात्रा काढत निषेध व्यक्त केला.

गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांना शासकीय नियमांबद्दल अवगत केले व १८ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याचे सांगिताच उपस्थित ग्रामस्थ आक्रमक झाले. जर असा नियमच असेल तर इतके दिवस तुम्ही आम्हाला आश्वासनाचे गाजर का दाखवत होता? असा प्रतिसवाल उपस्थित केला. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना शिक्षक दिला जाईल असे खोटे सांगुन आमची दिशाभूल करण्याचा प्रकार तुम्ही अधिकारी जाणून-बुजून करत असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.

हेही वाचलंत का?

 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *