Sindhudurg News : सावंतवाडीत शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयासमोर युवासेनेचे ‘बोंब मारो आंदोलन’ | महातंत्र

सावंतवाडी, महातंत्र वृत्तसेवा: राज्यात मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे डीएडधारक बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे शिक्षकांची भरती न केल्याच्या निषेधार्थ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवास आणि कार्यालयासमोर आज (दि.५) शिक्षक दिनी ठाकरे गटाच्या युवासेनेने ‘बोंब मारो आंदोलन’ केले. (Sindhudurg News)

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक रूची राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केसरकर यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या आंदोलकांना मज्जाव करून पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले. आंदोलकांनी शिक्षणमंत्री केसरकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Sindhudurg News)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शेकडो शिक्षकांच्या विनंती बदल्या जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या. त्यांच्या बदल्यात पर्यायी शिक्षक देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या महिनाभरातच शिक्षकांची आणि पालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे पालकवर्गात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सध्या अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असून त्याला चार चार वर्ग सांभाळावे लागत आहेत.

दरम्यान, यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवासेना जिल्हाध्यक्ष शिरसाट, युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक रूची राऊत यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

युवासेना सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुणाजी गावडे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजगावचे माजी उपसरपंच आबा सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, पंकज शिरसाट, योगेश नाईक, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, मदन राणे, वीरेंद्र चव्हाण, अमित भोगले, राजेश शेटकर, काजल सावंत, मीनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव, वैष्णवी पितळे आदी यावेळी उपस्थित होते.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह कणकवली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्तात ठेवला होता.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *