Solapur News: केवळ ३५ हजारांत विक्री झालेले बाळ ३ महिन्यांनी आईच्या कुशीत विसावले | महातंत्र

सोलापूर: महातंत्र वृत्तसेवा : सोलापूर शहरातून  मे २०२३ मध्ये अपहरण झालेल्या तीन महिन्यांच्या बाळाचा शोध लावण्यात सदर बझार पोलिसांना यश आले आहे. हे बाळ केवळ ३५ हजार रुपयांना विकले असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह हे बाळ विकत घेणार्‍या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बाळ आपल्या आईकडे लगबगीने गेले. आपल्या गुटगुटीत बाळाला कुशीत घेताचा आईला गहिवरून आले. हा भावनिक प्रसंग पाहून पोलीस ठाण्यातील पोलिसांचेदेखील डोळे पाणावले. (Solapur News)

याप्रकरणी पोलिसांनी वंदना नागेश मनसावाले (वय ३५, रा. नविन विडी घरकुल, सोलापूर), लक्ष्मी नरसप्पा सामलेटी (वय ५५, रा. नविन विडी घरकुल, सोलापूर), चंद्रभानू सुदर्शन यलगम (वय ४२) आणि लता चंद्रभानू यलगम (वय ४०, दोघे रा. नविन विडी घरकुल, सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. वंदना मनसावाले आणि लक्ष्मी सामलेटी या दोघींनी बाळाचे अपहरण करून ते यलगम दाम्पत्याला विकले होते. (Solapur News)

सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अकरा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची नोंद ३ मे २०२३ रोजी झाली होती. आयुष्य अजयसिंग गोटीवाले असे अपहरीत बाळाचे नाव आहे. याबाबत बाळाची आई मीराबाई अजयसिंग गोटीवाले यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

लष्कर परिसरात शितलादेवीचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. या मंदिरात ३ मे २०२३ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यामुळे मंदिरात मोठी गर्दी झाली होती. गोटीवाले परिवार हा मंदिरातच राहायला आहे. अजयसिंग व मीराबाई हे दाम्पत्य मंदिराची देखभाल करतात. त्यांना आयुष्य नावाचे ११ महिन्यांचे बाळ आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत अपहरणकर्त्यांनी आयुष्यचे अपहरण केले होते.

 Solapur News : केवळ ३५ हजारांत बाळाची विक्री

अपहरण केलेल्या बाळाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तब्बल तीन महिने विविध मार्गांनी तपास सुरू होता. पाच जणांची विशेष टीम नियुक्त करून बाळाचा तपास केला जात होता. पोलिस पथक परभणी येथेही जाऊन आले होते. एका खबर्‍यांकडून नवीन विडी घरकुलमधील दोन महिला बाळाला घेऊन राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर बझार पोलिसांच्या पथकाने ताबडतोब त्या महिलांना ताब्यात घेत विचारपूस केली. त्यावेळी केवळ ३५ हजारांत बाळ खरेदी केल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळाली.

तब्बल तीन महिन्यांनंतर बाळाला पाहून आईचा अश्रूंचा बांध फुटला…

सदर बझार पोलिसांनी बाळाला गुरुवारी ताब्यात घेतले. मीराबाई व अजयसिंग गोटीवाले या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे बाळ सुपूर्द केले. तब्बल तीन महिन्यांनी बाळा पाहून आई मीराबाई यांचा अश्रूंचा बांध फुटला. जोरात हंबरडा फोडून त्या रडू लागल्या. मन हेलवणारे दृश्य पाहून पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांच्या डोळ्यात पाणी आले. बाळाची ओळख करून पोलिसांनी खात्री करून घेतली. लगबगीने बाळ आपल्या आईच्या कुशीत विसावले.

१३ वर्षानंतरही मुलबाळ न होणार्‍या दाम्पत्याने बाळ घेतले विकत

नविन विडी घरकुलमध्ये राहणार्‍या चंद्रभानू व लता यलगम या दाम्पत्याच्या लग्नाला १३ वर्षे होऊनदेखील त्यांना मुलबाळ झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी बाळ विकत घेण्याचा निर्णय घेतला. यलगम यांच्या घराशेजारी राहणार्‍या वंदना मनसावाले व लक्ष्मी सामलेटी या दोघीं कर्जबाजारी झाल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यातूनच दोघींनी सामुदायिक विवाह सोहळ्यातून बाळ चोरून ते यलगम यांना विकले. या दोघांचा आर्थिक व्यवहार पूर्ण झालेला नसून आणखी काही पैसे देण्यात येणार असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *