पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गो-वंश संवर्धन आणि पशुपालनाचे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठे महत्त्व आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि विकास होतो. यासाठी देशी वाणांचे संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच त्यांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. राज्यातील गो वंशाच्या देशी वाणांचे प्रचार आणि प्रसार करून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मुख्यालयाचे उद्घाटन औंध जवळील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतलकुमार मुकने, गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, सनथकुमार गुप्ता, उद्धव नेरकर, दीपक भगत, आदी यावेळी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गोसेवा आयोग निर्माण करणे ही महाराष्ट्राची गरज होती. माझ्या मंत्री पदाच्या कार्यकाळात गो सेवा आयोग निर्माण झाला हे माझे भाग्य समजतो. मी मुद्दामच अशासकीय सदस्यांचा समावेश आयोगामध्ये केला आहे. त्यामुळे या आयोगाचे काम शासनाच्या अध्यादेशांमध्ये अडकून राहणार नाही. पशुसंवर्धन विभागालाही मी गोसेवा करणाऱ्यांचे संरक्षण आणि त्यासाठी अधिकाधिक मदत कशी करता येईल याचा सूचना दिल्या आहेत. गोसेवा आयोगाकडे शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे काम देण्यात येणार आहे तसेच या आयोगावर मोठी जबाबदारी असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आयोगावर अवलंबून असल्यामुळे या आयोगाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण निर्माण होणार नाही, यासाठी या आयोगाचे बजेट वाढविण्यात येणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. याबरोबरच गोसेवा हे एक चांगले बिजनेस मॉडेल होऊ शकते. गायीच्या दुधाबरोबरच गाईचे शेण आणि गोमूत्र यांना केवळ आपल्या देशातच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतही मोठी मागणी आहे. गोवंश उत्पादनांचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर झाले, तर या विभागातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि उत्पादन होऊ शकते. त्यामुळे तरुणांना अधिकाधिक या क्षेत्राकडे वळविले पाहिजे.
शेखर मुंदडा म्हणाले, गोवंश सेवा आणि संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गोसेवा करताना अनेक गोसेवकांचे प्राण गेले अशापैकी ५० गोसेवकांना प्रत्येकी १ लाख रुपये आयोगाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच गोसेवा करण्यासाठी आयोगाकडून गायांची खरेदी करण्यात येणार आहे. गोवंशीच्या उत्पादनांपैकी दुधाबरोबरच गोमूत्र आणि शेणापासून निर्माण झालेल्या पदार्थांचे व्यवसाय कसे तयार होतील आणि त्यामधून विशेषतः तरुणांना रोजगार निर्मिती करता येईल, यासाठी आयोग प्रयत्न करणार आहे.