अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
तालुक्यातील हरेगाव येथे चोरीच्या संशयावरून मागासवर्गीय युवकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यावे, अन्यथा मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे या मागासवर्गीय युवकांना शुक्रवारी हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. ही घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यातील आरोपींना दोन दिवसांत अटक करून त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सुमारे तासभर चाललेल्या या रोस्ता रोको आंदोलनामुळे नेवासे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. वाहनांच्या मोठ्या रांगा तयार झाल्या होत्या.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विभागीय प्रमुख भीमराज बागुल, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, सरपंच महेंद्र साळवी, प्रकाश चित्ते, नितीन दिनकर, प्रा. सुनीता गायकवाड, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, वंचित तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडदे, निखील पवार, नाना खरात, रमेश भालेराव, सुनील शिंगारे, आकाश सुर्यवंशी, राजू मगर, संजय बोरगे, विशाल सुरडकर, सुहास राठोड, सोनू राठोड, सलिम शेख, मोहन आव्हाड, बंडू शिंदे, रुपेश हरकल, रमाताई धिवर, संतोष मोकळ, गिरीधर आसने, प्रकाश आहिरे, मेजर कृष्णा सरदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, डॉ. बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नाना गलांडे, युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत कोठडी
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दीपक गायकवाड व पप्पू पारखे यांना ताब्यात घेतले असून त्यांना ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लवकरच इतर आरोपीनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली.