पुणे8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी निर्माणासाठी न्यासाच्या कोशात आतापर्यंत सुमारे 3200 कोटींपेक्षा अधिक निधी जमा झाला आहे अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. हेरिटेज हॅंडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास व अध्यक्ष विनय पत्राळे यावेळी उपस्थित होते.
स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले, मंदिर निर्माणसाठी लवकरच विदेशातून येणाऱ्या देणग्यांचा स्वीकार केला जाईल. आतापर्यंत विदेशातून कुठल्याच प्रकारची देणगी स्वीकारली गेलेली नाही. त्यासाठीच्या परवानगीला शासनाकडे अर्ज केलेला आहे. त्याला मंजुरी मिळताच विदेशातून येणाऱ्या देणग्या स्वीकारल्या जाणार आहेत.अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्रभू श्रीरामासह मंदिरातील देव देवतांना पुण्यात तयार झालेलं वस्त्र चढवलं जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे हे वस्त्र हातमागावर विणलं जाणार आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील भक्तगण या कार्यात सहभागी होऊ शकणार आहेत. त्या दृष्टिकोनातून ‘दो धागे श्रीराम के लिये ‘ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.भारतीय समाजातील अनेकविध जाती, पंथ, प्रांतातील नागरिक आपले आर्थिक स्तर आणि भाषिक विविधता यांच्या सीमा ओलांडून रामरायासाठी वस्त्र विणायला एकत्र येऊन जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवतील.10 डिसेंबर 2923 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान पुण्यातील सूर्यकांत काकडे फार्म या ठिकाणी हा उपक्रम संपन्न होणार आहे.
त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यातून हातमाग दाखल होणार आहेत.हेरिटेज हँडविविंग रिवायव्हल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.काही महानुभावांच्या हस्ते पहिले काही धागे विणले जातील व नंतर कोणीही येऊन आपल्या श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे या मागांवर विणू शकतील. वस्त्र विणण्याआधी नागरिकांना ते कसे विणावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.या बरोबरच या १३ दिवसांमध्ये याच ठिकाणी अनेकविध, भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात विणण्यात येणारे वस्त्र हे ४८ पन्हा असलेले असणार असून ते रेशमाचे असणार असल्याचे सांगत अनघा घैसास म्हणाल्या, या अंतर्गत विणण्यात येणारे वस्त्र हे रामाच्या मूर्तीसोबतच राम मंदिर परिसरातील इतर संबंधित ३६ मूर्तींसाठी देखील वापरण्यात येणार आहे. यामध्ये राम परिवारासोबतच शबरी, जटायू व इतर मुनींच्या मूर्तींचा सहभाग आहे.