साखरेच्या गोडव्याला महागाईचा फटका | महातंत्र

नवी मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : देशात साखरच्या उत्पादनात घसरण झाल्याने ऐनसणासुद्दीच्या काळात म्हणजेच अधिकमासापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. ही दरवाढ सलग सुरु राहिल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर साखर घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे चार रुपयांनी महाग झाली आहे. यामुळे आता साखरेच्या गोडव्याला महागाईचा फटका बसू लागला आहे. साखरेच्या कोट्यात सप्टेंबर महिन्यांत दोन लाख मेट्रीक टनाची वाढ केल्यानंतर ही दर नियंत्रणात येत नसून उलट दरवाढ होत असल्याचे समोर आले आहे.

देशात साखरेचा कोटा दर महिन्याला वाटप होतो. त्यानुसार जाड आणि बारीक साखरेचे दर निश्चित केले जातात. विशेष म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे साखरेच्या दरात चढउतार सुरु असते. जूनमध्ये साखर किरकोळ बाजारात 42 रुपये किलो होती. जुलै आणि ऑगस्टमध्ये 44 रुपये किलो तर आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 48 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली आहे. एपीएमसीत घाऊक बाजारात बारीक साखरेचे दर हे 33 ते 34 रुपये होते. ते आता 37 ते 38 रुपये झाले आहेत. तर जाड साखरेचे दर 34 रुपये किलो होते. ते 38 रुपये 50 पैसे ते 39 रुपये किलोपर्यंत पोहचले. ही दरवाढ दिड महिन्यांत झाली असून किलोमागे साखर चार रुपयांनी महाग झाल्याची माहिती बॉम्बे शुगर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. ही दरवाढ सणासुदीत आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्यांत महाराष्ट्राच्या वाट्याला 23.5 लाख मेट्रीक टन साखर एवढा होता. सप्टेंबरमध्ये त्या वाढ होऊन 25 लाख मेट्रीक टन वाढविण्यात आला. दोनवेळा एप्रिल आणि ऑगस्टमध्ये दोन लाख मेट्रीक टन साखरेचा कोट्यात अतिरिक्त वाढ केली होती. मात्र साखरेच्या कोट्यात वाढ केल्यानंतर ही दर नियंत्रणात येत नसून उलट दरवाढ होत असल्याचे समोर आले आहे. सहजिकच यामुळे गणेशोत्सवात मोदकासह मिठाईच्या पदार्थात वाढ होण्याची शक्यता नाही.

साठेबाजी रोखण्यासाठी साखरेवर साठा मर्यादा?

पुणे ः साखरेच्या सुरू असलेल्या कृत्रिम दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने घाऊक व्यापार्‍यांकडील साठवणुकीसाठी साखरेवर साठा मर्यादा घालण्याचा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. घाऊक बाजारात साखर दराने क्विंटलला 3950 ते 4000 रुपयांची पातळी गाठल्याने खडबडून जागे झालेल्या केंद्राने कडक उपाययोजनांचा भाग म्हणून साठा मर्यादेचे बंधन आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या असून, तशी अधिसूचनाही निघण्याची अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली. मागील चार महिन्यांपासून साखरेची सुरू असलेली वाढती सट्टेबाजी आणि साठवणूकदारांनी केलेला मोठा शिरकाव यामुळे साखरेच्या दरात मागणी व पुरवठ्यानुसार दरवाढ न होता कृत्रिमरीत्या दर वाढविले जात असल्याचे सांगण्यात येते.

The post साखरेच्या गोडव्याला महागाईचा फटका appeared first on महातंत्र.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *