‘आधी तुमचं कुटुंब सांभाळा…’, घराणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले ‘हीच हिंदूंची संस्कृती’

तुमच्याकडे सांगण्यासाठी घराण्याचा इतिहासच नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना दिलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. जी हुकूमशाही आहे तिला चिरडून टाकायला इंडिया आघाडी आली आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच देशाच्या रक्षणासाठी गरज लागली तर मेहबुबा मुफ्ती यांनाही सोबत घेऊ असं म्हटलं आहे. 

“घराणेशाहीच्या विरोधात आहोत असं ते ओरडत आहेत. पण मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही आहे कारण तुमच्याकडे सांगण्यासाठी घराण्याचा इतिहासच नाही. जे लोक कुटुंबव्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्यांच्या घराण्याबद्दल बोलू नये. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. कारण कुटुंबव्यवस्था, घराणं हीच आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. तिच्या मुळावर घाव घालणार आणि घराण्यावर बोलणार. आधी तुमचं कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

“गणेशोत्सवात अधिवेशन का बोलावलं आहे?”

 हिंदुत्ववादी सरकार असून गणेशोत्सवात अधिवेशन कसं काय लावता? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. तुम्हाला दुसरा मुहूर्त सापडला नाही का? मुहुर्त लावणारे ज्योतिषी कुठून आणले आहेत? अशी विचारणा त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्वस साजरा केला जात असताना नेमकं असं तुमचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन घेत होतात? असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 

Related News

“तुम्ही मणिपूरवर बोलायचाच तयार नव्हता. अखेर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला, पण मणिपूर वगळता इतर गोष्टींवरच भरपूर बोलतात. मग त्यावेळी हे करता आलं नसतं का. पण हिंदुत्तवादी आहात ना…तुम्ही सणांच्या आडवे येणार, पण पितृपक्ष पाळणार. पितृपक्षात अधिवेशन का घेत नाही? हिंदूद्वेष्टा सरकार म्हणून आजही मी त्यांचा निषेधच करतो. पण चला आज मी स्वागत करतो. पण या अधिवेशनात सुप्रीम कोर्टाने जसा दिल्लीतील अधिकारांच्या बाबतीत निर्णय दिला, तेव्हा मनाविरोधात निर्णय दिला म्हणून लोकसभेत पाशवी मतदान करत दिल्लीचा कब्जा मिळवलात. तसंच वटहुकूम काढून मराठा, धनगर यांनी हक्क मिळवून द्या,” असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने टीका

“काल जो काही शासकीय अत्याचार झाला, त्याचा निषेध करुन चालणार नाही. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर एक फूल दोन हाफ आहेत. पण राज्यात आंदोलन सुरु असताना कोणाकडेही वेळ नाही. माता भगिनी उपोषणाला बसल्या आहेत. काल, परवा जेव्हा इंडियाची बैठक सुरु होती, तेव्हा त्यांचे प्रवक्ते आमच्यावर टीका करत होते. यांच्याकडे इंडियाविरोधात बोलायला वेळ आहे. पण आंदोलनकर्त्यांकडे एकाही मंत्र्याला जावंसं वाटलं नाही. आता चौकशीचा फार्स करणार. सखोल म्हणजे किती खोल जाणार आहात. कशाला हे थोतांड सुरु आहे,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

“मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना राज्यात काय सुरु आहे याची रोज कल्पना दिली जाते. मग आपल्या एक फूल, दोन हाफला हे आंदोलन होत आहे याची माहिती नव्हती का? बारसूत जो काही लाठीचार्ज झाला, वारकऱ्यांना मारहाण झाली त्याची अद्याप चौकशी सुरु आहे. करोनात जीवाची बाजी लावणारे आपले पोलीस इतके राक्षस होऊ शकतात. म्हणजेच यामागे कोणीतरी आदेश देणारा आहे. पोलीस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *