NCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल

विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील बांदोडकर (Bandodkar College) आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील (Joshi-Bedekar College)  NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजलीय. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. 

ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजलीय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोकं आणि पायावर उभं करण्यात आलं आहे. सीनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. विद्यार्थी थोडासा हलला तरी हा सीनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे. 

या सीनिअर विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे की ज्युनिअर विद्यार्थी त्यांना घाबरुन तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कॉलेजमध्ये शिकायचं आहे, आमचं करियअर उद्धव्स्त होईल या भीतीने विद्यार्थीच नाही तर त्यांचे पालकही समोर येऊन तक्रार करत नाहीत. बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्यांनीही शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रारर करावी असं आवाहन केलं आहे. पण यानंतरही विद्यार्थी स्वत:हून पुढे येण्यास धजावत नाहीएत. यावरुन या सीनिअर विद्यार्थ्यांची किती दहशत आहे हे पाहिला मिळतंय. 

Related News

अशा शिक्षेमुळे विद्यार्थ्यानमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेक विद्यार्थी एनसीसी नकोच असं म्हणतात दिसतायत. एनसीसीचे युनिट हेड सीनियर विद्यार्थीच असतात. या सीनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सीनिअर विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.  विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी म्हटलंय. 

तसंच या प्रकारामुळे याने एनसीसीमार्फत जी चांगली काम होतात ती झाकोळली गेली आहेत. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असले प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एक कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये असेही सुचित्रा नाईक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *