चंद्रपूर : ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने शिक्षिकेचा मृत्यू | महातंत्र
चंद्रपूर; महातंत्र वृत्तसेवा : शाळेत जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या शिक्षिकेचा ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज  (4 सप्टेंबर) सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर मार्गावरील रिलॉयन्स पेट्रोल पंपजवळ घडली. अनिता किशोर ठाकरे (48) असे मृत शिक्षीकेचे नाव आहे.

चंद्रपूर शहरातील जनगन्नाथ नगर परिसरातील श्रीकृपा वसाहतीतील रहिवासी महिला शिक्षिका लखमापूर येथील जिल्हा परिषद हिंदी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती किशोर ठाकरे हे चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अनिता ठाकरे या सोमवारी सकाळच्या सुमारास दुचाकीने (एमएच 34 बीएस 4977) लखमापूर येथे शाळेत जाण्यासाठी घरून निघाल्या. दरम्यान, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पेट्रोल पंपजवळ नागपूरकडे जाणार्‍या ट्रकने (आरजे 11 जीसी 0829) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्या दुचाकीवरून खाली पडल्या.  यावेळी ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. शिक्षकेच्या अकाली निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *