क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवल

gadchiroli crime news : क्राईम पेट्रोल या शो मध्ये गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना कथित स्वरुपात पहायला मिळतात. मात्र, क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. गडचिरोली येथे 20 दिवसात 5 जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. 2 महिलांनी पूर्ण कुटुंब सपंवल आहे. पोलिसांनी या दोघी महिलांना अटक केली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे कोडे उलगडले आहे. अन्नपाण्यात विष मिसळून पाच जणांची हत्या करण्यत आली आहे. सून आणि मामीचे हे दुष्कृत्य आहे. 20 दिवस विषप्रयोग सुरु होता. यांचा हत्येचा प्लान पाहून पोलिसही हडबडले आहेत. या दोघींना अटक करण्यात आली आहे. 

आधी पती- पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत लागोपाठ पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आलाय. अन्नपाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपविल्याचे समोर आले.  सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले.  

Related News

शंकर तिरुजी कुंभारे (५२),  विजया शंकर कुंभारे,  त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) आणि मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत.  सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५)  आणि रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडलं नमेकं?

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे  यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने  पती शंकर तिरूजी कुंभारे  यांनी त्यांना चंद्रपूरला नेले.त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही  उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी आली होती.  प्रकृती   खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती.  चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक  मृत्यूची नोंद झाली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. 

संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती बीएस्सी ऍग्री सेकंड टॉपर आहे. ती व रोशन हे पोस्ट खात्यात सोबत काम करत. तेथेच त्यांचे सूत जुळले. डिसेंबर २०२२ मध्ये त्या दाेघांनी विवाह केला. ते एकाच जातीचे आहेत, पण प्राध्यापक वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट तिने रचला. रोशनची मामी रोजा रामटेके महागावातच राहते. रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग होता. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट अतिशय थंड डोक्याने आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

संघमित्रा कुंभारे हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले.  २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

सध्या या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व   रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस तपास करत आहेत.

 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *