नगर : महातंत्र वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कष्टकरी, शेतकरी व जनविरोधी धोरणाविरोधात जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने क्रांतीदिनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. कामगारांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. आयटकचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर टोकेदार, किसान सभेचे बन्सी सातपुते, मनपा कर्मचारी संघटनेचे अनंत लोखंडे व हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिका कार्यालयातून मोर्चास प्रारंभ झाला. जोरदार घोषणाबाजी देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धडकला.
सरकारची धोरणे सर्वसामान्य जनतेसाठी नसून, भांडवलदार, उद्योगपती व कॉर्पोरेट कंपन्यांच्या आर्थिक हितसंबंधासाठी राबविले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कामगार विरोधी श्रमसंहिता तात्काळ रद्द करावी, ईपीएस 95 पेन्शन धारकांना पेन्शन वाढ करावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना 21 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना देण्यात आले. यावेळी बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, भारती न्यालपेल्ली, बाळासाहेब सुरूडे, राजेंद्र बावके, शरद संसारे, जीवन सुरूडे, संगिता कोंडा, कविता मच्चा, वर्षा चव्हाण यांच्यासह कामगार व कष्टकरी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा :
सॅनिटरी नॅपकीनमुळे फुटली खुनाला वाचा ! आरोपी पोलिसांच्या जाळ्यात