नांदेड : मोर्चात सहभागी झालेल्या काँग्रेस आमदारांना आंदोलकांनी हुसकावून लावलं

नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारच्या घटनेनंतर राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान याचे पडसाद नांदेड जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको, मोर्चे काढून आंदोलन केले जात आहे. तर राजकीय नेत्यांबद्दल आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तर अशाच रोषाचा सामना नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांना करावा लागला आहे. कारण मोर्चात सहभागी झालेल्या या दोन्ही आमदारांना आंदोलकांनी अक्षरशः हुसकावून लावले. आंदोलकांचा वाढता रोष पाहता आमदारांनी देखील तेथून काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. 

सकल मराठा समाजाकडून आज नांदेड बंदची हाक देण्यात आली होती. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र, या मोर्चात सहभागी झालेल्या काँगेसच्या दोन आमदारांना मोर्चाकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काँगेसचे विधानपरिषद सदस्य अमर राजूरकर हे घोषणा देत मोर्चात सहभागी झाले. पण त्याचवेळी मोर्चेकऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्यासमोर प्रचंड घोषणा देण्यात आल्या. एवढंच नाही तर काही तरुण अमर राजूरकर यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणांना अडवले आणि आमदार अमर राजूरकर यांना सुखरूप बाहेर काढले. 

विशेष म्हणजे, असाच काही प्रकार काँगेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासोबत देखील घडला. मोहन हंबर्डे मोर्चात सहभागी होताच त्यांना देखील विरोध करण्यात आला. ‘चले जाव, चले जाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. तरुणाचा संताप पाहून हंबर्डे यांनी मोर्चातून काढता पाय घेतला. त्यामुळे या दोन्ही घटनांची जिल्हाभरात चर्चा पाहायला मिळत आहे. 

जलसमाधी घेण्याचा माहुरमध्ये प्रयत्न

नांदेडच्या माहूर तालुक्यातील धनोडा गावाजवळ पैनगंगा नदीपात्रात उतरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होत, जल समाधी घेण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जालना येथे झालेल्या लाठीमाराचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत नदीपात्रात उतरलेल्या कार्यकर्त्याना बाहेर काढत आंदोलन थांबवलंय. अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणाव पसरला होता. 

आज नांदेड बंदची हाक…

जालना येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात बंद पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठ देखील बंद असून, सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation Jalna : जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल; 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *