नंदुरबार, महातंत्र वृत्तसेवा : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे नंदुरबारचे पाणीस्त्रोत आटले असून पाणी सुबत्ता अनुभवणाऱ्या नंदुरबारवासियांवर तीन-चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळण्याची नामुष्की आली आहे. दरम्यान, नंदुरबारचे पिण्याचे पाणी जवळच्या खेड्यांमधील शेतांना देण्याचा तसेच पाणीचोरी करणाऱ्या अवैध नळ कनेक्शन्सचा मुद्दा या निमित्ताने चर्चेत आला आहे. त्याचबरोबर शहराच्या चारही बाजूने शेकडो एकर्स वरील होऊ घातलेल्या नव्या वसाहतीसुध्दा विरचक धरणातूनच पाणी पळवणार असतील तर पुढे काय स्थिती उद्भवेल? हा प्रश्न शहरवासीयांना भेडसावू लागला आहे.
नंदुरबार शहराला दोन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा नेहमीच पालिकेकडे असतो, हे येथील पाणी नियोजनाचे वैशिष्ट्य आहे. प्रतिदिन पाण्याचा वापर ९ एमएलडी असून दरमाणसी ८० एमएलडी पाणी नगरपालिका देत असते. शिवण नदीवरील विरचक धरण, आंबेबारा धरणावरील आष्टा उदभव, १५७ विंधन विहिरी हे शहराचे स्त्रोत आहेत. पण यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने ते सर्व रसातळाला गेले आहेत. यंदा पावसाअभावी पाणीसाठाच राहिला नसल्याने यापुढे शहरवासीयांना एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड पाणी देणे शक्य होणार नाही, असे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले असून नगरपरिषदेच्या कार्यकाळात प्रथमच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर करण्याची नामुष्की आली आहे.
एकंदरीत या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहराला वीरचक आणि आंबेबरा धरणाप्रमाणेच आणखी प्रभावी मोठ्या पाणी योजनेची पर्यायी व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी तापी नदीच्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात गुजरातला वाहून जाते. त्याला अडवून शहराकडे वळते करणे हा एक मोठा उपाय अनेक वर्षापासून विचाराधीन पडलेला आहे. शहर विकासाचे नियोजन करताना मात्र प्रशासनाने आणि नेत्यांनी या गोष्टीला चालना दिली नसल्याची किंमत एकप्रकारे आता जनतेला मोजावी लागेल. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अशी योजना तातडीने साकारली जावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यात त्याचा आधार होऊ शकतो. पालकमंत्री डॉक्टर गावित यांच्या त्या कृतीकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले असले तरी तातडीचे उपाय अमलात आणणे ही आत्ताची खरी नितांत गरज आहे.
शहरातील अहिल्याबाई विहिरीतून शहरवासीयांची तहान भागवता येईल इतके पाणी उपलब्ध होऊ शकते म्हणून या विहिरीचे ग्रहण करून पाणीपुरवठा सुरू करावा; असा एक पर्याय पुढे आला आहे. नगरपरिषदेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी तसे पत्र जिल्हा प्रशासनाला व पालकमंत्री यांना दिले आहे. लोकहित लक्षात घेऊन प्रशासन यावर ताबडतोब कृती करते, हे पुढे पाहायला मिळेल. दरम्यान, पाणीसंकट लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने भल्या मोठ्या पाणीचोरीला आधीच का थांबविले नाही? हा प्रश्न चर्चेत आला असून बोगस नळ कनेक्शन चा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे. पाणी नियोजनाचे तीन तेरा वाजले तरी चालेल अशा मुजोर भूमिकेत राहून नव्या वसाहतींचे भरमसाठ लेआउट मंजूर करण्याचे जे धोरण राबविले जात आहे, त्यावर सुद्धा आजच्या पाणीसंकटामुळे लोकांमध्ये संतप्त चर्चा सुरू झाली आहे. भरमसाठ लेआउट मंजूर करताना नव्या वसाहतींसाठी कुठून पाणी उपलब्ध करणार? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. लहरी पर्जन्यमानामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आताच अपूर्ण पडताहेत. मग भविष्यातील पाणी संकट किती गहिरे असेल याची कल्पना यावरून येऊ शकते.
हेही वाचंलत का?