File Photo
हिंगोली, महातंत्र वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणार्थीचा उपोषणाच्या ठिकाणी भोवळ आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ४) सायंकाळी घडली. प्रकाश नामदेवराव मगर (वय ५४) असे उपोषणार्थीचे नाव असल्याचे गावकर्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हयात आमरण उपोषण सुरु होते. त्यानुसार सिंदगी येथेही उपोषण सुरु करण्यात आले होते. त्यानंतर आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला मुदत देऊन उपोषण मागे घेतल्यानंतर सिंदगी येथेही आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मात्र जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या मुदतीपर्यंत साखळी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला आहे. त्यानुसार गावात दररोज पाच पुरुष व २५ महिला साखळी उपोषणाला बसत आहेत. सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत हे उपोषण केले जात आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. ४) सकाळी सात वाजता पाच पुरुष गावकरी व २५ महिला उपोषणाला बसले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उपोषणार्थीपैकी प्रकाश मगर यांना अस्वस्थ वाटू लागले अचानक त्यांना भोवळ आल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेमुळे सिंदगी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मयत प्रकाश मगर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.