आलमट्टीच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेबाल नाला पाहणी: आलमट्टी धरणातील पाणी उपयोगात आणण्याचे प्रयत्न

सोलापूर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत, कर्नाटकातील आलमट्टी धरणातील पाणी सोलापूर शहर आणि दक्षिण व अक्कलकोट तालुक्यांसाठी उपयोगात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकातील हेबाल नाल्याची पाहणी केली.

Related News

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात अत्यल्प साठा आहे तर कर्नाटकातील आलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. तेथील पाणी इंडी कॅनॉलमधून १०६ किलोमीटरपर्यंत ५० क्यूसेक वेगाने येऊ शकते. तेथून पुढे नाल्यातून १२ किलोमीटर अंतर कापून पाणी भीमा नदीच्या पात्रातून औज बंधारा येथे येऊ शकते. याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी शुक्रवारी चर्चा केली. त्यानुसार शनिवारी नाल्याची पाहणी केली.

आलमट्टी धरणातील पाणी औज बंधारा येथे आणणे शक्य आहे का, याबाबतचा अहवाल पुढील आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. तूर्तास पाहणी केली पण वस्तुस्थितीचा अहवाल दोन दिवसांत शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

वस्तुस्थितीची केली पडताळणी

आगामी काळात पाऊस पडला नाही तर आलमट्टी धरणातील पाणी औज बंधाऱ्यात आणण्याची सूचना नियोजन समिती सदस्य डॉ. चंद्रशेखर हविनाळे यांनी केली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या पाणी कराराअंतर्गत पाणी आणता येते, असे हविनाळे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सांगितले. याबाबत वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी कर्नाटकातील हेबाल नाला येथे भेट दिली.

दिव्य मराठीने केला होता पाठपुरावा

औज बंधाऱ्यातील पाणी कर्नाटक पळवत असल्याची बाब दिव्य मराठीने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर आलमट्टी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी घेण्याचा मुद्दा चर्चेत आला होता.

अहवालावर शासन घेणार निर्णय

^आलमट्टी धरणातील पाणी सोडल्यानंतर औज बंधाऱ्यात पाणी येणे शक्य आहे किंवा नाही याबाबतचा वस्तुस्थिती अहवाल सिंचन विभाग तयार करणार आहे. तो शासनाकडे पाठवल्यानंतर शासनाकडून योग्य तो निर्णय होईल.

-कुमार आशीर्वाद,​​​​​​​ जिल्हाधिकारी

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *