बिद्री; टी. एम. सरदेसाई : वयाने तो १६ वर्षाचा पण त्याचे सर्व बालपण आजारात अंथरूणाला खिळून गेले. बालपण उमलण्या अगोदर कोमजून गेले होते. अगदी आठ-नऊ वर्षाचा असताना त्याला असाध्य रोगाची लागण झाली. कमरेपासून खाली पूर्ण शरीरच लुळे पडले. कुटुंबाने अनेक ठिकाणी विविध उपचार करूनही तो बरा होवू शकला नाही. अखेर नियतीने त्याच्यावर झडप घालून हिरावून नेले, अन् कुटुंबाचा आक्रोशाचा बांध फुटला. उंदरवाडी (ता.कागल) येथील सिद्धेश तानाजी चौगुले (वय-१६) असे त्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटूंब झुंजले; पण अखेर नियती जिंकली ! याचा प्रत्यय आला.
उंदरवाडी येथील सिध्देश सात ते आठ वर्षापर्यंत ठणठणीत होता. शाळेत जात होता. दिसायला गोड, गोंडस सिद्धेशला पायाचे दुखणे सुरू झाले. हातावर पोट भरणारे कुटुंब. वडील तानाजी चौगुले चर्मकार व्यावसाईक. एकीकडे कुंटुंबाला जगविण्यासाठी कष्टपूर्ण धडपड आणि दुर्धर आजारी मुलाची जबाबदारी. दुहेरी संकटामुळे हातबल झाले होते. सिध्देशचे दिवसेंदिवस वय वाढत जाईल तसे आजार वाढत गेला. बालपण फुलायच्या आधीच कोमेजून गेले.
सिद्धेशचे कमरेपासून खाली संपूर्ण शरीरच लुळे पडले होते. खुर्चीत बसूनच गेली दहा वर्ष तो आयुष्य जगत होता, त्याची जगण्याची जिद्द व आशा यामुळे कोणतेही उपचार घेत औषधे खात होता. चिमुकल्या पंखात बळ भरण्यासाठी चुलते लक्ष्मण चौगुले यांनी स्वतःच्या मुलासारखी त्याची काळजी घेऊन उपचारासाठी दाही दिशा फिरवले. मुंबई, हैदराबाद, पुणे, कर्नाटक, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी उपचार केले; पण काही उपयोग झाला नाही. घरातील सर्व त्याची देखभाल करत होते. अखेर नियतीने तीन दिवसांपूर्वी त्याला हिरावून नेले. अन् कुटुंबाचा आक्रोशाचा बांध फुटला. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण, आजी-आजाेबा असा परिवार आहे.
हेही वाचा :