मुंबई; महातंत्र वृत्तसंस्था : मुंबईच्या गणेशगल्ली येथील ‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाचा रविवारी दर्शन सोहळा पार पडला, मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्धी पावलेल्या गणेशगल्ली येथील बाप्पाचा प्रथम दर्शन सोहळा प्रसारमाध्यमांवर रविवारी संध्याकाळी ७ वाजता पार पडला.
शेकडो प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत ठीक ७ वाजता राजाची पहिली झलक पाहायला मिळाली. थाटात सोनेरी पावलाने उभा असलेल्या राजाची पहिली झलक ही डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. म्यानातून तलावर काढत योद्ध्याच्या आवेशात असलेल्या राजाला माध्यमाच्या क्लिक आणि फ्लॅशच्या प्रकाशाच्या पावसात माध्यमकर्मीने राजाला सलामी दिली. हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण होत असताना मंडळाने रायगडाचा देखावा तयार केला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती मुंबईच्या राजात उतरवली आहे.
वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यां मधून थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने गणेशगल्लीतील ठिकठिकाणीच्या गणेश भक्तांनी मोबाईल व टीव्हीवर राजाचे दर्शन घेतले. यावेळी राजाचा प्रथम दर्शन सोहळा असल्याने परिसरात गणेश भक्तांनी एकच गर्दी केलेली दिसत होती.