युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे | महातंत्र

कोल्हापूर, महातंत्र वृत्तसेवा : मराठा समाजाची भावना आणि नेमकी तांत्रिक बाब, यामध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे याकडेच सरकारने लक्ष द्यावे; पण हा मुद्दा सोडून सर्व नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने आंदोलनावर बोलत आहेत, अशी खंत माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याखेरीज मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आयोग नेमून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण समोर आणावे लागेल. हा तांत्रिक; परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर हालचाली कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

ते म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील दरवर्षी आंदोलन करतात. यावर्षी आंदोलनामध्ये काय घडले, हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या मागण्यांबाबत मराठा समाजाची जी भूमिका असेल, तीच भूमिका आपलीही असेल.

सरकार आणि समाजाची बैठक व्हावी

सरकारने अनेक महिन्यांपूर्वी समिती स्थापन केली होती. या समितीला आपण वारंवार सूचना दिली होती की, आरक्षणासाठी वेगवेगळे निकष आहेत, त्यांच्या पूर्ततेसाठी लक्ष द्यायला हवे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

आरक्षण द्या, म्हणजे झाले

राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी समर्थ असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर टिपणी करताना संभाजीराजे म्हणाले की, असे असेल तर स्वागतच आहे. राज्यात आणि केंद्रात त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे. केंद्रात असो की, राज्यात असो, आरक्षण द्या, म्हणजे झाले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *